नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने कोरोना संकटाशी लढण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 10 कोटी रूपयांची भरघोस मदत केली आहे. तसेच जिल्हा प्रशासन व विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने करोना नंतर शेती, आरोग्य, सामाजिक, आर्थिक व जीवनशैलीवर होऊ घातलेल्या परिणामांवर अभ्यास प्रकल्प राबविण्याचा मानस असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले. YCMOU helps CM Fund
मुक्त विद्यापीठाच्या वतीने 10 कोटी रूपयांचा धनादेश जिल्हाधिकारी मांढरे यांनी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ई. वायुनंदन यांच्या कडून स्विकारला. यावेळी वेळी विद्यापीठाचे वित्त अधिकारी एम.बी. पाटील, कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख रावसाहेब पाटील, उपकुलसचिव विवेक ओक, कैलास मोरे, चंद्रकांत पवार, कैलास मोहिते उपस्थित आदी उपस्थित होते.
मांढरे म्हणाले, करोना हे संकटच आहे. परंतु या संकटाचा सामना करताना आमच्या जीवनशैलीवर काही सकारात्मक बदलसुद्धा झाले असल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले आहे. गेल्या दोन महिन्यांच्या काळात शेतकरी आत्महत्यांमध्ये कमालीची घट झाली आहे. वैद्यकीय उपचार घेण्याचे प्रमाणातही लक्षणीय घट झाली आहे. इतर आजारांची रूग्णसंख्याही नोंद घेण्याइतपत कमी झाली आहे. तसेच स्वच्छतेसह वैयक्तिक आरोग्याची काळजी घेणारी जीवनशैली लोकांनी आत्मसात केली आहे. या सर्व सकारात्मक बदलांवर शासन, प्रशासन बारकाईने लक्ष ठेवून आहे.
येणाऱ्या काळात या बदलांवर आधारित शेती, आरोग्य, सामाजिक, आर्थिक व जीवनशैलीशी संबंधीत प्रकल्प मुक्त विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून राबविण्यात येईल, मुक्त विद्यापीठातील कृषि विज्ञान केंद्रात ॲग्रो ॲम्ब्युलन्सद्वारे शेत पिकांवर रोग, त्यांचे निदान, माती परिक्षणाचा उपक्रम राबिवण्यात यावा, असे मांढरे यांनी सांगितले.
कुलगुरू डॉ. ई. वायुनंदन म्हणाले की, महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने सुरू असलेले हे लोकविद्यापीठ सामाजिक जाणिवेतून सतत आपली जबाबदारी पार पाडत आले आहे. त्यामुळे महाराष्ट्र संकटात असताना मुक्त विद्यापिठाने ही मदत केली आहे असे नमूद केले. केले. YCMOU helps CM Fund