ylliX - Online Advertising Network

मुक्त विद्यापीठांचे कोणतेही अभ्यासक्रम रद्द केलेले नाहीत

केंद्रीय अनुदान आयोगाचा खुलासा

नाशिक : देशभरातील दूरस्थ शिक्षण पद्धतीचे कुठलेही अभ्यासक्रम रद्द करण्यात आलेले नाहीत. विविध विद्यापीठांच्या अभ्यासक्रम प्रस्ताव छाननीदरम्यान ज्या अभ्यासक्रमांमध्ये त्रुटी आढळून येतील त्या त्रुटी भरून काढण्यासाठी संबंधित विद्यापीठांना एक महिन्याची मुदत देण्यात येणार असल्याचा खुलासा केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (युजीसी) करण्यात आला आहे. यासंदर्भातील पत्र मुक्त विद्यापीठांना पाठवण्यात आले असून, येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ प्रशासनासही प्राप्त झाले आहे. यामुळे दूरस्थ पद्धतीने शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

देशभरातील मुक्त व इतर अशा साधारण ३५ विद्यापीठातील दूरस्थ शिक्षण पद्धतीचे काही अभ्यासक्रम केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (युजीसी ) रद्द करण्यात आल्याची बातमी गेले दोन दिवस माध्यमातून  प्रसारित झाली. त्यामुळे देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. देशभरातील शिक्षण क्षेत्रात त्याविषयी तीव्र प्रतिक्रिया उमटली. त्याची केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) तातडीने दखल घेवून एका विशेष जनसुचनेद्वारे खुलासा केला आहे. तसेच तसे पत्र संबंधित विद्यापीठांना लगोलग पाठविले. त्यात देशभरातील दूरस्थ शिक्षण पद्धतीचे कुठलेही अभ्यासक्रम रद्द करण्यात आलेले नाहीत. तसेच इतर अभ्यासक्रम व अनुषंगिक माहिती १६ ऑगस्टला आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतरही काही अभ्यासक्रमांबाबतीत संदेह असल्यास आयोगाकडे नियमानुसार दाद मागता येणार असल्याचे सदर प्रसिद्धीपत्रकाच्या शेवटी अधोरेखित करण्यात आले आहे. त्यामुळे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी चिंता करू नये, असे आवाहन कुलसचिव दिनेश भोंडे यांनी केले आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.