ylliX - Online Advertising Network

Kojagiri Pournima कोजागिरी पौर्णिमा काय सण आहे ?

कोजागिरी पौर्णिमा काय सण आहे हे आजकाल कोणाला विचारले तर नक्कीच ७०% लोकांना सांगता येणार नाही ..(शोकांतिका) आणि ती चुकीच्या पद्धतीनेहि साजरा करतात…बरेच जण दूधात दूध मसाला टाकून गरम करून पितात…म्हणजे त्यांना वाटते कोजागिरी साजरी झाली.काही तर हा दिवस सोडून सवडीनुसार इतर दिवशी ती साजरा करतात ,enjoy करतात.आपल्या धर्मात आपल्या पूर्वजांनी वैज्ञानिक दृष्ट्या विचार करून सण सुरु केले आहेत.ते आपण योग्य पद्धतीने साजरे केले तर नक्कीच त्याचा आपल्याला फायदा होईल.Kojagiri Pournima
आश्विन पौर्णिमेस होणारा प्राचीन लोकोत्सवाला वात्स्यायनाने कौमुदीजागर व वामन पुराणाने दीपदानजागर म्हटले आहे. बौद्धकाळात हा उत्सव कशा प्रकारे साजरा होत असे, त्याचे वर्णन उन्मादयंती जातकावरून कळते. या दिवशी बळीराजाची पूजा करावी असे वामन पुराणात सांगितले आहे.
धर्म शास्त्रानुसार कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री महालक्ष्मी पृथ्वीवर साक्षात चंद्रमंडळातून येऊन पृथ्वीवर उतरते आणि मध्यरात्री (संस्कृतमध्ये) ‘को जागर्ति’ (म्हणजे ‘कोण जागत आहे’) असे म्हणत मनुष्याचे प्रयत्न पहात पृथ्वीतलावर संचार करीत असते अशी धारणा आहे. कोण जागे आहे याचा मतितार्थ आहे कोण सजग आहे आणि ज्ञानासाठी आतुर आहे असे देवी विचारत येते. या कारणामुळे या व्रताचे नाव कोजागिरी पौर्णिमा असे पडले.
धार्मिक ग्रंथामध्ये वर्णीत एका श्लोकानुसार –
निशीथे वरदा लक्ष्मी: को जागर्तिति भाषिणी।
जगाति भ्रमते तस्यां लोकचेष्टावलोकिनी।।
तस्मै वित्तं प्रयच्छामि यो जागर्ति महीतले।।
कोजागिरी पौर्णिमा हा सण मोठ्या उत्सहाने साजर करतात. ही पौर्णिमा पावसा नंतरची पहिली पौर्णिमा असते हिला अश्विन पौर्णिमा म्हणतात,पावसात आकाश स्वछ नसते परंतु या पौर्णिमेला आकाश खूप दिवसानंतर स्वछ आणि सुंदर दिसते. त्यामुळे याचा आनंद घेता यावा व याचे स्वागत करावे म्हणून हा सण साजरा करतात. या दिवशी पोहे व शाळेचे पाणी प्रसाद म्हणून वापरतात.
शेतकरी या दिवसात आपली सर्व कामे संपवून घरी बसून आराम करत असतो या दिवशी रात्री दुध गर्माकारून त्यामध्ये चंद्राला पाहतात.कारण दुध ही पांढरा शुभ्र असते व चंद्र ही त्या दिवशी ९९ % प्रकाशित असतो ,त्यामुळे ही आपली प्रथा आहे. चंद्र या दिवशी ३ लक्ष ८५००० किलो मीटर अंतरावर असतो. त्यामुळे या रात्री वातावरण छान असते आकाश खुले असते म्हणून ही रात्र मौजमजा करण्याचा असतो.या दिवशी दूध आटवून त्यात केशर, पिस्ते, बदाम, चारोळी, वेलदोडे, जायफळ, साखर वगैरे गोष्टी घालून, लक्ष्मीदेवीला नैवेद्य दाखविला जातो. दुधात मध्यरात्री पूर्ण चंद्राची किरणे पडू देतात आणि मग ते दूध प्राशन केले जाते. उत्तररात्रीपर्यंत जागरण केले जाते. या दिवशी प्रत्येक कुटुंबातील ज्येष्ठ अपत्याला ओवाळून त्याची किंवा तिची ‘आश्विनी’ साजरी करतात.
धार्मिक महत्त्व –
या दिवशी करायच्या व्रतात रात्री लक्ष्मीची आणि ऐरावतावर बसलेल्या इंद्राची पूजाही केली जाते. उपोषण, पूजन व जागरण या तीनही अंगांना या व्रतात सारखेच महत्त्व आहे. या व्रतात रात्रीच्या पहिल्या प्रहरी लक्ष्मी व इंद्र ,बळीराजा यांच्या प्रतिमांची पूजा करतात व मग त्या दोघांना पुष्पांजली समर्पित करतात. अशी पूजा झाल्यावर पोहे व नारळाचे पाणी देव-पितरांना समर्पून व आप्तेष्टांना देऊन स्वतः सेवन करतात. चंद्राला आटीव दुधाचा नैवेद्य दाखवतात. दुसऱ्या दिवशी प्रात:काळी बळीराजा-लक्ष्मीची पूजा करून व सर्वांना भोजन घालून पारणे करतात.
ब्रह्मपुराणात या व्रताची कृत्ये थोडी निराळी सांगितली आहेत. रस्ते झाडावेत. घरे सुशोभित करावीत. दिवसा उपवास करावा. गृहद्वाराजवळ अग्नी प्रज्वलित करून त्याची पूजा करावी. चंद्राची पूजा करून त्याला दूध व खिरीचा नैवेद्य दाखवावा. भार्येसह रुद्र, स्कंद, नंदीश्वर, ज्यांच्याकडे गायी असतील त्यांनी सुरभी, मेंढे बाळगणाऱ्यांनी वरुण, हत्ती बाळगणाऱ्यानी विनायक व घोडे बाळगणाऱ्यांनी रेवंत व निकुंभ या देवतांची पूजा करावी.विविध मंदिरांमध्ये कोजागरी पौर्णिमा पूजा- अर्चा करून साजरी केली जाते. लक्ष्मीची विशेष उपासना केली जाते.
पौराणिककथानुसार शरद पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीचा जन्मदिवस मानला जातो, ज्या दिवशी ती समुद्र मंथनातून प्रकट झाली होती. कोजागरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र आपल्या संपूर्ण १६ कलांमध्ये असतो. चंद्राची किरणं विशेष अमृतमयी गुणांनी युक्त असतात. श्रीकृष्ण १६ कलांचे अवतार मानले जातात. द्वापार युगात वृंदावनमध्ये (व्रजमंडळ)भगवान श्रीकृष्णाने गोपिकांसोबत रात्री रासक्रीडा (महारासलीला) केली होती. वृंदावनात निधीवनात आजही श्रीकृष्ण आणि गोपिका रासलीला रचतात अशी मान्यता आहे. त्या विशेष प्रसंगाची आठवण करुन वैष्णव संप्रदायाचे भक्त रासोत्सव साजरा करतात.श्रीकृष्ण आणि राधाची विशेष उपासना केली जाते.
कोजागिरी पौर्णिमा कथा –
प्राचीन काळी मगध देशात वलित नावाचा एक संस्कारी परंतु दरिद्री ब्राह्मण राहत होता. ब्राह्मण जेवढा सज्जन होता त्याची पत्नी तेवढीच दृष्ट होती. ती ब्राह्मणाच्या गरिबीमुळे दररोज त्याला त्रास देत होती. संपूर्ण गावात ती तिच्या पतीची निंदा करत असे. पतीच्या विरुध्द आचरण करणे हाच तिने आपला धर्म मानला होता. एवढेच नाही तर पैशाच्या हव्यासापोटी ती आपल्या पतीला चोरी करण्यासाठी प्रोत्साहित करत होती. एकदा श्राद्ध करताना ब्राह्मणाच्या पत्नीने पूजेमध्ये ठेवलेले सर्व पिंड उचलून एका विहिरीत फेकून दिले. पत्नीची अशी वर्तणूक पाहून दुःखी मनाने ब्राह्मण जंगलात निघून गेला.
जंगलात गेल्यानंतर त्याला तेथे नागकन्या भेटतात. त्या दिवशी अश्विन मासातील पौर्णिमा होती. नागकन्यांनी ब्राह्मणाला रात्री जागरण करून लक्ष्मीला प्रसन्न करण्याचे कोजागर व्रत करण्यास सांगितले. ब्राह्मणाने विधिव्रत कोजागर व्रत केले. या व्रताच्या प्रभावाने ब्राह्मणाला अपार धन-संपत्ती प्राप्त झाली.
भगवती लक्ष्मीच्या कृपेने त्याच्या पत्नीचीही बुद्धी शुद्ध झाली आणि ते दाम्पत्य सुखाने संसार करू लागले.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.Kojagiri Pournima
लेख – प्रशांत मराठे
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.