शेतकरी आणि गरीब रुग्णांसाठी ज्ञानाचा वापर करा-गिरीष महाजन
नाशिक ग्रामीण दुर्गम भागातील शेतकरी, सामान्य व गरीब रुग्णांना आरोग्य सुविधा देण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी पुढे यावे, तसेच पदवी संपादन करणाऱ्या स्नातकांनी सेवावृत्तीने या भागात वैद्यकीय सेवा देण्याचे कार्य करावे, असे आवाहन राज्याचे वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा आणि लाभक्षेत्र विकास मंत्री गिरीष महाजन यांनी केले.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या 17 व्या दीक्षांत समारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी विविध वैद्यकीय शाखांमधील पदवी, पदव्युत्तर, पदवीका अभ्यासक्रम पुर्ण करणाऱ्या 74 गुणवत्ता प्राप्त स्नातकांना सुवर्णपदक व संशोधनासाठी 22 पीएचडी पदवी प्रदान करण्यात आल्या. कार्यक्रमास भारतीय आर्युविज्ञान संस्थानचे संचालक डॉ.रणदीप गुलेरिया, टाटा मेमोरियल रुग्णालयाचे संचालक डॉ.राजेंद्र बडवे, विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.दिलीप म्हैसेकर, कुलसचिव डॉ.कालिदास चव्हाण आदी उपस्थित होते.
महाजन म्हणाले, वैद्यकीय क्षेत्रात सेवाभाव दिसून यावा ही अपेक्षा रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची असते. समाजात डॉक्टरांना देवाच्या जागी मानले गेले आहे. त्यामुळे समाजाचा विश्वास टिकविण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रात सामाजिक मुल्यांची जपणूक होण्याची गरज आहे, असे केल्यास रुग्णाचे कुटुंबिय आणि डॉक्टर यातील वाद टाळता येतील. बदलत्या काळानुसार डॉक्टर व रुग्णांमध्ये संवाद कौशल्यासाठी अभ्यासक्रम सुरु करण्याचा विचार आहे, असे ते म्हणाले.

वैद्यकीय क्षेत्रातील कट प्रॅक्टीसचा त्रास गरीब आणि असहाय्य रुग्णांना होत असून वैद्यकीय उपचार व तपासण्यांचा खर्च प्रत्यक्षापेक्षा कित्येकपटीने वाढतो. याला आळा घालण्यासाठी आणि रुग्णांना दिलासा देण्यासाठी शासन लवकरच कायदा करणार आहे. या क्षेत्रात येतांना स्नातक समाजासाठी व राज्यासाठी आपण महत्वपूर्ण योगदान देऊ शकतात. वैद्यकीय क्षेत्रात सकारात्मकदृष्टीने नवनवीन संकल्पनांचा वापर करुन संशोधन होणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले.
महाजन म्हणाले, गरीब रुग्णांच्यासाठी महाआरोग्य शिबीर, अवयवदान अभियान, आदिवासीक्षेत्रातील वैद्यकीय मदत कार्य करुन सेवा केली जात आहे यासाठी शासन, सामाजिक संस्था कार्यरत आहेत. शासनाने या क्षेत्रातील विकासासाठी वैद्यकीय फेलाशिप प्रक्रिया ऑनलाईन राबविली आहे. अनेक दुरदर्शी निर्णय घेतांना विद्यार्थ्यांच्यादृष्टीने ऑनलाईन परीक्षा प्रणाली, प्रबंध तपासणी प्रणाली अशा सुधारणा या दोन वर्षात विद्यापीठात करण्यात आल्या आहेत. तसेच निर्धारित वेळेच्या आधी परीक्षांचे निकाल जाहीर करुन विद्यापीठाच्या कार्यक्षमतेचा परीचय दिला आहे ही प्रक्रिया अधिक सक्षम करण्यासाठी विद्यापीठातील मंजूर पदांवर नियुक्त्यांना मान्यता देणे अधिकारी कर्मचाऱ्यांशी संबंधित असणाऱ्या विविध विषय तातडीने मार्गी लावण्याचा शासनाचा प्रयत्न आहे, असे ते म्हणाले.
डॉ.गुलेरिया म्हणाले, वैद्यकीयक्षेत्र स्नातकांना महत्वपूर्ण सेवेची संधी देत असून याकडे व्यवसाय म्हणून पाहिले जाऊ नये. तुमच्यातील ज्ञानाचा प्रकाश समाजातील दु:ख दूर करण्यासाठी वापरला जावा याची जबाबदारी स्नातकांवर आहे.
डॉ.बडवे म्हणाले, वैद्यकीय क्षेत्रात काम करतांना यशाच्या मार्गावर वाटचाल करण्यासाठी कामातील आनंदासाठी आपल्याकडे येणाऱ्या वेदनेने व्याकुळ झालेल्या रुग्णाला दिलासा दिल्याने आपला आनंद वाढतो.कुलगुरु डॉ.म्हैसेकर म्हणाले, यशाच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या सर्वांचे मी अभिनंदन करतो. येथून पुढे संधी आणि आव्हानांचे नवीन आयुष्य तुमच्यासमोर सुरु होत असून विद्यापीठाने मुल्य, शिक्षण आणि विचारांचा जो वारसा तुम्हाला दिला आहे त्याचा वापर करावा. असे सांगून त्यांनी विद्यापीठाने केलेल्या विविध सुधारणा व योजनांची माहिती दिली.
यावेळी विविध अभ्यासक्रमांमध्ये आपली गुणवत्ता सिद्ध करणाऱ्या सुल्तान मोईनोद्दीन शौकत अली याला नऊ तर मानसी मयुर गुजराथी हिला 7 सुवर्णपदके प्रदान करण्यात आली. यावर्षी औषधी, दंत, आयुर्वेद, युनानी, होमीओपॅथी आदी विद्याशाखांमधील स्नातकांनी 535 पदवीका, 5539 पदवी व 2809 पदव्युत्तर अभ्यासक्रमात यश प्राप्त केले आहे.
सुलतानला ९, तर मानसीला ७ सुवर्णपदके
डॉ.वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयाचा एमबीबीएसचा नाशिकचा विद्यार्थी सुलतान मोईउददीन शौकतअली विद्यार्थ्यांने विविध विषयात 9 सूवर्ण पदक मिळवले आहेत. तर याच महाविद्यालयाची मानसी मयुर गुजराथी यांनी ७ सुवर्णावर आपले नाव कोरले आहेत.
यामध्ये शानदार झालेल्या कार्यक्रमात डॉ.वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयाचा विद्यार्थी सुलतान मोईउददीन शौकतअली यांना डॉ. दयानंद , स्वर्गीय व्यंकटेश जामकर, राजेबहाददूर हार्ट फाउंडेशन,डॉ एस एम पाटणकर, स्वर्गीय श्रीराम खशाबा बाकरे, डॉ अजन्येतू , गोजरबाई रामराव भामरे, डॉ शिरीष के भन्साळी, डॉ विनायक चितळे हे सर्व सुवर्णपदक तर जॉन्सन अॅण्ड जॉन्सन मुंबई यांच्याकडून 10 हजार रूपये रोख अशी एकूण 9 पारितोषिक देण्यात आले आहेत.
मानसी मयुर गुजराती एमबीबीएसची विद्यार्थीनी यांना क्रांतीज्योती डॉ रखमाबाई मेमोरिअल, शामराव अलीयस,नानासाहेब चौधरी, डॉ कामलताई देशमुख, स्वीर्गीय विजयादेवी फडतारे, डॉ. सुधाकर साने, डॉ ग.ज.परांजपे अशी एकूण 7 सुवर्णपदके प्रदान करण्यात आली.