विविध मागण्यासाठी ट्रस्टचे कर्मचारी संपावर, पोलिसांवर सर्व जबाबदारी
नाशिक : बारा ज्योतिर्लिंगापैकी एक महत्वाचे जोतिर्लिंग असलेल्या त्र्यंबकेश्वरमध्ये आज सोमवार आणि महाशिवरात्रीचा दुहेरी योग साधण्यासाठी भाविकांनी मध्यरात्रीपासूनच मोठ्या प्रमाणात गर्दी केली. शिवरात्रीच्या निमित्ताने मंदिरांमध्येही पूजा, महाआरती, रोषणाई, फुलांची आरास, सजावट असं प्रसन्न वातावरण असून, दुसरीकडे मंदिरात परिस्थिती काहीशी वेगळी आहे. त्र्यंबकेश्वर मंदिराच्या सुमारे १२० हून अधिक कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. त्यामुळे ऐन महाशिवरात्रीच्या काळात त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये कर्मचारी हजर नाहीत. या संपामुळे मंदिरात येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी मंदिर समितीकडून पर्यायी व्यवस्था करण्यात आले आहे.
मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या भाविकांनी दर्शनासाठी आणि पूजेसाठी आज गाभाऱ्यालगत गर्दी केली, यामुळे भाविकांची मोठी गर्दी झाली आणि त्यामुळे दर्शनासाठी त्यांना मोठी कसरत करावी लागली आहे. तर दुसरीकडे अपुरे कर्मचारी असल्याने व्हीआयपी दर्शनासाठीही भाविकांना खूप वेळ ताटकळत उभे रहावे लागले. व्हीआयपी भाविकांनी मंदिरात पहाटेपासून दर्शन व अभिषेकासाठी गर्दी केल्यामुळे सर्वसामान्य भाविकांना मात्र मोठा त्रास सहन करावा लागला आहे.
सुरक्षा रक्षकांचा संप असल्यामुळे अतिरिक्त बंदोबस्ताचा ताण पोलिस यंत्रणेवर आला असून, पोलिसांनी मात्र कडक बंदोबस्त ठेवला होता.शनिवार दोन मार्चपासून त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे १२० पेक्षा अधिक कर्मचारी संपावर गेले आहेत. तर यागोदर देवस्थान ट्रस्ट शिपाई कर्मचाऱ्यांनी यापूर्वी जानेवारी महिन्यात दोन दिवस सिटू संघटनेने केलेल्या राज्यव्यापी संपात सहभाग नोंदवला होता. यामध्ये प्रमुख मागणीमध्ये वेतन वाढ, सेवानियम आदी ठेवल्या आहेत. शिवरात्रीनिमित्त शनिवारपासूनच देवदर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळली आहे. देवस्थान ट्रस्टने होमगार्ड आणि पोलिसांची कुमक मागविली होती. जिल्हा पोलिस अधिक्षक आरती सिंह यांनी रविवारी त्र्यंबकेश्वर मंदिरास भेट दिली.
ट्रस्टचे चेअरमन जिल्हा न्यायाधीश बोधनकर तसेच सचिव व नगर पालिका मुख्याधिकारी डॉ. चेतना केरुरे यांनी विश्वस्तांच्या मदतीने पूर्ण नियोजन केले. देणगी दर्शनासह गावकरी गेटही बंद केले आहे. दुसरीकडे गर्दीचा वाढलेला ओघ आणि अपुरे कर्मचारी यामुळे व्हिआयपी प्रोटोकॉल बंद ठेवला आहे.
सोमेश्वर मंदिरात पहाटे साडेपाच वाजता खासदार हेमंत गोडसे, शिवसेनेचे गटनेते विलास शिंदे, अजय बोरस्ते, बबनराव घोलप, उदय निमसे, नगरसेवक संतोष गायकवाड, राधा बेंडकुळे, सामान्य नागरीक यांच्यासह सोमेश्वर ट्रस्टचे विश्वस्त पदाधिकारी यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली आहे. तर महाशिवरात्रीनिमित्त गंगापुररोड वरील सोमेश्वर महादेव मंदिरात मोठ्या उत्साहामध्ये यात्रेचे आयोजन करण्यात येते. तर ट्रस्ट कडून भाविकांना खिचडीची व्यवस्था केली होती.