नाशिक शहरातील सिडको परिसरात राहणाऱ्या तीन युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. यात एका पोलिस कर्मचाऱ्याचाही समावेश आहे. वैभव पवार (वय २७ रा. श्रीराम मंदिर चौक, उत्तमनगर) महेश लाळगे (वय ३० रा.महाकाली चौक) महेश बागुल (वय ३५ रा. पाथर्डीफाटा) मृतांची नावे आहेत. हे तिघे पिंपळद येथील वालदेवी धरणावर पोहोण्यासाठी गेले होते. या घटनेची नोंद वाडिवऱ्हे पोलिसांत झाली आहे.
याबाबत वाडिवऱ्हे पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, वैभव पवार, महेश लाळगे आणि महेश बागुल हे शनिवारी दुपारी पिंपळद येथील वालदेवी धरणावर गेले होते. तिघेही पोहोण्यासाठी पाण्यात उतरले परंतु तिघांना पाण्याचा अंदाज आला नसल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाला.
ही घटना शनिवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत त्यांचा चौथा मित्र गणेश जाधव (वय २९) हा पाण्यात उतरला नसल्याने वाचला. त्यानेच आजूबाजूला आरडा ओरड करून स्थानिक गुराख्याना मदतीला बोलावले. परंतु तोपर्यंत तिघांनाही जलसमाधी मिळाली होती. मयत पवार हा पुणे येथे एम.ई.चे शिक्षण घेत होता. तर मयत बागुल हा मुंबई येथे पोलिस दलात आहे.