के.व्ही.एन.नाईक महाविद्यालयात विवेक युवा विचार सप्ताहाचे दुसरे पुष्प
गुन्हा कुठलाही असो त्याची सुरुवात किरकोळ कारणामुळे होत असते, परंतु त्याचे परिणाम मात्र अतिशय मोठे असतात, असे प्रतिपादन नाशिक शहर पोलीस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांनी केले. तरुणाईमध्ये विवेक जागा झाल्याशिवाय बदल होणार नाही. तरुणाईने आपले ध्येय योग्य वेळी स्वतः निश्चित करावे असेही यावेळी ते म्हटले.
विवेकवाहिनी व विवेक युवा विचार सप्ताह समिती यांच्या विद्यमाने १२ जानेवारी ते २० जानेवारी रोजी “विवेक युवा विचार सप्ताह” चे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी सप्ताहाचे दुसरे पुष्प के.व्ही.एन. नाईक महाविद्यालयात गुंफण्यात आले. या व्याख्यानासाठी मुख्य अतिथी म्हणून नाशिकचे पोलीस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
विद्यार्थ्यांनी प्रत्येक क्षेत्रात नेतृत्व स्वीकारावे. कोणतीही गोष्ट मिळविण्यासाठी आपल्याला शॉर्ट कट हवा असतो, यामुळे अनेकदा आपले नुकसान होते. विद्यार्थ्यांनी सायबर स्पेस चा वापर योग्य कारणासाठी करवा, स्वामी विवेकानंदांसारख्या लोकांचे विचार वाचले तर ते अतिशय फायद्याचे राहील, असेही यावेळी त्यांनी म्हटले. इंटरनल सिक्युरिटी हा अतिशय महत्वाचा विषय आहे, व यावर अभ्यास करणे देखील तितकेच गरजेचे आहे. भारताच्या ७६ मुख्य जिल्ह्यांमध्ये नक्षलवाद वाढलेला आहे. शासन ही शोषण करणारी यंत्रणा आहे असे वातावरण तयार करून तरुणांच्या मनात ते बिंबवले जाते. त्यामुळे आपण यावर गंभीरतेने विचार करणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले. बातमी आल्यानंतर त्यामागचा मूळ उद्देश जाणून घेणे महत्त्वाचे आहे. नाशिकमध्ये मोटारसायकल थ्रेप आणि प्रॉपर्टी क्राईम ची समस्या ही अतिशय मोठी आहे, असेही यावेळी ते बोलले. याचबरोबर आपल्या कारकिर्दीतील नाशिक हे सर्वात सुंदर शहरदेखील आहे असे ते म्हणाले.
आयुष्यात वेळ ही सर्वात मोठी गोष्ट आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या उद्दिष्टासाठी स्वतःला झोकून द्यायला हवे. सध्याच्या काळात ९०% तरुणाईचा वेळ हा मोबाईलच्या चुकीच्या वापरात वाया जात आहे, असे देखील ते बोलले.
यावेळी के.व्ही.एन नाईक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. कोंडाजी मामा आव्हाड, के.व्ही.एन नाईक महाविद्यालयाचे प्राचार्य बडगुजर सर विवेक युवा विचार सप्ताह समितीचे आयोजक सुरेश नखाते आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण सोनवणे यांनी केले. मोनिका सांगळे हिने मान्यवरांचा परिचय करून दिला, प्रीतम भामरे यांनी आपले स्वागतपर मनोगत व्यक्त केले व प्रा. शरद काकड यांनी आभार प्रदर्शन केले.
भित्तीपत्रकाचे उदघाटन-
यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बनवलेल्या भित्तीपत्रकाचे उदघाटन करण्यात आले.स्वामी विवेकानंद आणि आजचा तरुण असे या भित्तीपत्रकाचा विषय होता.विद्यार्थ्यांनी बनवलेल्या या भित्तीपत्रकाचे विशेष कौतुक पाहुण्यांनी केले.