सटाणा : भाजप-शिवसेना युती सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा शेतकऱ्यांना लाभ मिळत नसल्याने शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. कर्जमाफी जाहीर केल्यानंतर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठया प्रमाणावर वाढल्या असल्याने सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी असल्याचा आरोपही राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पगार यांनी केला आहे.
कर्ज व आर्थिक संकटापुढे हतबल झाल्याने बागलाण तालुक्यातील आखतवाडे येथील तरुण शेतकरी किशोर खैरनार ( वय ३१ वर्षे) यांनी स्वतःच्या शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली आहे. आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबियांची त्यांच्या घरी जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन सांत्वन केले. त्याप्रसंगी अॅड. रविंद्र पगार बोलत होते.
यावेळी बागलाण तालुक्याचे तहसीलदार श्री. सैंदाणे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत आत्महत्याग्रस्त खैरनार कुटुंबियांना लवकरात लवकर शासकीय मदत मिळून देण्याची सूचना देखील अॅड. रविंद्र पगार यांनी केली.नाशिक जिल्ह्यात सातत्याने झालेला अवकाळी पाऊस गारपीट वादळ व दुष्काळ यामुळे शेतकऱ्यांची ३ ते ४ पिके वाया गेली असून शेतकरी हतबल झाला आहे.
मोठया प्रमाणावर आर्थिक अडचणीत सापडलेला शेतकरी कर्जबाजारी झाल्याने आत्महत्येकडे वळत आहे. या कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने सरसकट कर्जमाफी देणे गरजेचे होते. या व इतर मागण्यांसाठी मोठे शेतकरी आंदोलन देखील झाले.
त्यानुसार सरकारने मध्यंतरी शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केली. परंतु यात शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी न देता विविध निकष घातल्याने शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा झाला नाही. कर्जमाफी जाहीर करण्यात आली असली तरीही आर्थिक संकटातून सुटका होत नसल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरूच आहेत.
सरकारच्या निकषांमुळे नाशिक जिल्ह्यात सुमारे ४.५ लाख शेतकरी हे कर्जबाजारी असतांना फक्त २८ टक्के म्हणजेच १ लाख ३६ हजार ५६९ इतक्याच शेतकऱ्यांना कर्ज माफीचा लाभ होणार आहे. त्यामुळे कर्जमाफीतील सर्व प्रकारचे निकष तातडीने रद्द करावे अशी मागणी देखील अॅड. रविंद्र पगार यांनी बोलतांना केली.
यावेळी माजी आमदार संजय चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे सटाणा शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, तालुकाध्यक्ष शैलेश सूर्यवंशी, पंचायत समितीचे सदस्य वसंत पवार, युवक अध्यक्ष किरण पाटील, अशोक सावंत, खेमराज कोर, नामदेव सावंत, योगेश जगताप आदी उपस्थित होते.