ylliX - Online Advertising Network

कर्जमुक्तीचा प्रारंभ शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने दिवाळी – डॉ.सुभाष भामरे

  • जिल्ह्यातून एक लाख 74 हजार 525 शेतकरी कुटुंबाचे अर्ज ऑनलाईन प्राप्त
  • मान्यवरांचे हस्ते 30 शेतकरी कुटुंबांचा साडी-चोळी, शाल देऊन सत्कार
  • छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना-2017 अंतर्गत कर्जमुक्ती प्रारंभ

नाशिक : राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्टीने सक्षम करण्यासाठी राज्य आणि केंद्र शासन प्रयत्नशील असून कर्जमुक्तीचा प्रारंभ शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने दिवाळी आहे, असे प्रतिपादन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील जिल्हा नियोजन भवन येथे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना-2017 अंतर्गत कर्जमुक्ती प्रारंभ कार्यक्रमात ते बोलत होते.

डॉ.सुभाष भामरे मार्गदर्शन करतांना.

डॉ.भामरे म्हणाले,  गारपीट, दुष्काळ आणि अवेळी पाऊस अशा नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी संकटात सापडला होता. त्याला सक्षम करणे महत्वाचे होते. कर्जाच्या दुष्टचक्रातून बळीराजाची सुटका करण्यासाठी शासनाने कर्जामाफी जाहीर केली. या योजनेमुळे शेतकऱ्यांमध्ये नवा विश्वास निर्माण होऊन ते नव्या उमेदीने शेती करतील आणि कृषीक्षेत्राच्या विकासालाही चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 ते म्हणाले, राज्य शासनाने शाश्वत शेतीसाठी जलयुक्त शिवार अभियान सुरु केले. या अभियानाला शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग मिळाल्याने त्याचे लोकचळवळीत रुपांतर झाले आहे. या अभियानामुळे 20 लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. 15 हजार गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न यामुळे सुटला असून पुढील दोन वर्षात 10 हजार गावे टंचाईमुक्त होतील.

कार्यक्रमाला खासदार हरिश्चंद्र चव्हाण, महापौर रजंनाताई भानसी, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, बाळासाहेब सानप, डॉ.राहुल आहेर, अनिल कदम, प्रभारी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, सहकार सहनिबंधक मिलिंद भालेराव  आदी उपस्थित होते.

केंद्र शासनाने देखील प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेच्या माध्यमातून राज्यातील 26 प्रकल्पांना प्राधान्याने आर्थिक सहाय्य मंजूर केले आहे. त्यामुळे अपूर्ण प्रकल्प लवकर पूर्ण होण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.

संपूर्ण कर्जमाफी बेबाक प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले

गावडे म्हणाले, जिल्ह्यातून एक लाख 74 हजार 525 शेतकरी कुटुंबाचे अर्ज ऑनलाईन प्राप्त झाले आहेत आणि गावनिहाय यादी देखील उपलब्ध झाली आहे. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी 1040 केंद्र कार्यरत होते. योजनेतील पात्र शेतकऱ्यांपैकी प्रातिनिधीक स्वरुपात प्रत्येक तालुक्यातील दोन शेतकरी कुटुंबांना संपूर्ण कर्जमाफी झाल्याबाबतचे बेबाक प्रमाणपत्रे वितरण करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. उर्वरित पात्र शेतकऱ्यांनाही असे प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही लवकरच करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

कर्ज माफीचे आणि प्रमाणपत्र वाटप करत असताना मान्यवर आणि ते स्विकारताना शेतकरी.

मान्यवरांचे हस्ते 30 शेतकरी कुटुंबांचा साडी-चोळी, शाल देऊन सत्कार करण्यात आला आणि संपूर्ण कर्जमाफी बेबाक प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले . यावेळी सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या राज्यस्तरीय कर्जमुक्ती प्रारंभ कार्यक्रमातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाचे थेट प्रक्षेपण दाखविण्यात आले.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.