नाशिक (राम खुर्दळ) : महापालिका आणि राज्य परिवहन मंडळाच्या वाद आणि त्यामागील एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या नादात नागरिक व विद्यार्थ्यांचे हाल होत असून एसटी महामंडळाने बस फेऱ्या कमी केल्याने गिरणारे भागातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत.
कमी केलेल्या बस फेऱ्या त्याही अनियमित तसेच दुगाव फाट्यावर बस थांबत नसल्याने त्यामुळे होत असलेले शैक्षणिक नुकसान यामुळे संतप्त झालेल्या विध्यार्थ्यांनी २ तास बस रोखल्या होत्या. महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलक विद्यार्थ्यांना नियमित बस देण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन थांबविण्यात आले.
राज्य परिवहन मंडळाकडून चालविण्यात येणारी नाशिक शहर बस सेवा प्रचंड तोट्यात असून त्यामुळे अनेकवेळा महामंडळाने ही सेवा चालविण्यास असमर्थता दर्शवली आहे. महापालिकाही ही सेवा चालविण्यास असमर्थ असल्याचे अनेकवेळा प्रस्ताव धुक्वण्यात आल्यामुळे लक्षात येत आहे. मात्र याचा त्रास नाहक नागरिक व विद्यार्थ्यांना होत आहे. याचा परिणाम म्हणून महापालिका एसटी महामंडळामध्ये शीत युद्ध सुरु झाले असून शहरातील अनेक भागात महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी बस फेर्या कोणत्याही सूचना न देता मनमानी पद्धतीने बंद केल्याचेही समोर आले आहे.

त्याचाच परिणाम म्हणून गिरणारे दुगाव भागातील शहर बस फेऱ्या कमी केल्या गेल्या. नादुरुस्त बस या भागात पाठविण्यात येतात. यामुळे बससेवा अडचणीत आणण्याचा प्रकार घडत आहे. एसटी महामंडलाच्या या सर्व ढिम्म कारभाराचा बोजा केवळ वाहक चालकांवर टाकल्याने नागरिक प्रवाशी, विद्यार्थ्यांच्या संतापाचे बळी वाहक चालक ठरत होते.
या सर्व घटनाचा उद्रेक दुगाव (ता.नाशिक) विद्यार्थ्यांकडून झाला. एसटी महामंडळाला निवेदने देऊनही लक्ष दिले जात नव्हते. अनियमित येणाऱ्या बस, दुगाव फाट्यावर बस न थांबणे या कारणांमुळे विद्यार्थ्यांनी २ तास बस रोखून थेट रस्ता रोको केला. या रस्ता रोकोला स्थानिक नागरिकानी साथ दिली. एसटी विभागाचे वाहतुक आगर व्यवस्थापक शुभांगी शिरसाठ यांचेशी बससेवा नियमित देण्याच्या अश्वासनावर सकारात्मक चर्चा झाल्यावर विध्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले.