समृद्धी महामार्ग : कामात अडथळा म्हणून शेतकऱ्यांना नोटीसा

शिवडे, नाशिक : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या मोजणीसाठी नाशिकच्या शिवडे येथे मोजणी करिता आलेल्या अधिकाऱ्यांना पळवून लावत या प्रकल्पाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावे आता चॅप्टर नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांनी या नोटीसा बजावल्या असून सर्वेक्षण व मोजणी कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी ४२ शेतकऱ्यांना या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. याद्वारे या शेतकऱ्यांवर आता खटला चालविण्यात येणार असल्यामुळे हा वाद चिघळण्याची शक्यता आहे.

आपल्या वर्तनामुळे सिन्नर परिसरात दखलपात्र गुन्हा घडून नागरिकांच्या स्वास्थ्यास धोका होऊन शांतता दुभंगेल असे का समजू नये? याची खबरदारी म्हणून तुमच्यावर चॅप्टर खटला का चालवू नये असे प्रश्न विचारून शेतकऱ्यांना कारणेदाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

कोणत्याही परिस्थितीत सर्वेक्षणाचे काम होऊ देणार नाही असे बोलून तुम्ही परिसरातील शेतकऱ्यांना चिथवण्याचे काम केले असून यामुळे परिसरातील नागरिकांच्या स्वास्थ्याचा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. सर्वेक्षण होत आहे अशा ठिकाणी आपण पुन्हा गेल्यास आपल्या हातून अदखलपात्र स्वरुपाचः गुन्हा नोंद होऊ शकतो त्यामुळे तुम्ही तेथे जाण्याचे टाळावे असेही नाशिक ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेचे विशेष कार्यकारी दंडाधिकारी के.एस. नवले यांनी या नोटिसीमध्ये नमूद करण्यात आले आहे.

मात्र या नोटीसा शेतकऱ्यांनी नोटीसा स्वीकारल्या नसल्यामुळे या नोटीसा ग्रामपंचायतीच्या नोटीस बोर्डवर लावण्यात आल्या आहेत. नोटीसा प्राप्त झाल्यामुळे शेतकरी संतप्त झाला असून समृद्धी महामार्गाचा वाद अजूनच चिघळण्याची शक्यता आहे.

प्रशासनाचे चर्चा करण्याचे निमंत्रणाच शेतकऱ्यांनी अशा पद्धतीने धुडकावून लावल्यामुळे आता यापुढे न्यायालयीन खेळ रंगण्याची चिन्हे आहेत. याप्रकरणी शेतकऱ्यांना वकिलामार्फत आपले म्हणणे मांडण्याची मुभा देण्यात आली असून हजर राहण्याचे आवाहन दंडाधिकाऱ्यांनी केले आहे.

 

या नोटिसांचा शेतकरी संघर्ष समिती आणि किसान सभा यांनी निषेध करत असून परिसरातील शेतकरी लोकशाही मार्गाने आंदोलन करत असताना पोलिसी बळाचा वापर आणि केसेस करून शेतकऱ्यांना धमकावण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या नोटिसांविरोधात न्यायालयात दाद मागणार आहोत. – राजू देसले, प्रवर्तक, शेतकरी संघर्ष समिती आणि किसान सभा

या बाबत शहापूर येथे २६ एप्रिलला दहाही जिल्ह्यातील शेतकरी एकत्र येऊन होणारे जनआंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता असून सर्वच स्तरातून आता समृद्धी प्रकल्पाने बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना पाठींबा मिळत आहे. त्यामुळे सरकारने जर वेळीच दखल घेतली नाही तर आंदोलन तीव्र होवू शकते असा इशारा सुद्धा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.

अशी आहे नोटीस

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.