ylliX - Online Advertising Network

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

नाशिक, दि. 25:- राज्य शासनाच्या क्रीडा विभागाने ‘शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार’ व महिला क्रीडा मार्गदर्शक, संघटकसाठी ‘जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार’ यासाठी अर्ज मागवले आहेत. विहीत नमुन्यात अर्ज www.mumbaidivsports.com  या संकेतस्थळतील लिंकवर उपलब्ध असून अंतिम दिनांक 30 नोव्हेंबर 2017 पूर्वी ऑनलाइन पध्दतीने अर्ज सादर करावेत तसेच ऑनलाइन अर्जाची प्रत संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात 5 डिसेंबर 2017 पूर्वी स्वयंसाक्षांकित कागदपत्रांसह सादर करावी.

सन 2014-15, 2015-16 व 2016-17 या वर्षांसाठी राज्यातील मान्यता प्राप्त खेळांच्या अधिकृत राज्य संघटनेमार्फत आंतराष्ट्रीय- राष्ट्रीयस्तरावरील पुरुष व महिला खेळाडू, कनिष्ठ व वरिष्ठ गटातील पदक विजेते, साहसी उपक्रम, दिव्यांग खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक, संघटक-कार्यकर्ते, महिला क्रीडा मार्गदर्शक, महिला संघटक-कार्यकर्ते यांनी अर्ज सादर करावेत. सन 2014-15 या वर्षातील पुरस्कारांसाठी ज्यांनी यापूर्वी अर्ज केले असतील त्यांनी नवीन नियमावलीनुसार नव्याने अर्ज करणे गरजेचे आहे.

पुरस्कारांचे प्रकार व माहिती पुढील प्रमाणे आहे.

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू)–

क्रीडा क्षेत्रात विशेष उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्रातील खेळाडूंना गौरव पत्र, मानचिन्ह व 1 लक्ष रुपयांचा ‘शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार’ प्रदान करण्यात येईल.

उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार

ज्या क्रीडा मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाने राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय स्तरावर खेळाडू सहभागी होण्यास व घडण्यास मदत झाली अशा मार्गदर्शकांचा गौरव नमूद क्रीडा प्रकारांच्या तीन गटातील उत्कृष्ट ठरणाऱ्या तीन मार्गदर्शकांना गौरव पत्र, मानचिन्ह व 1 लक्ष रुपयांचा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. महिला क्रीडा मार्गदर्शकांना ‘जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार’ व दीव्यांग खेळाडूंच्या क्रीडा मार्गदर्शकास ‘विशेष पुरस्कार’ देण्यात येईल.

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (संघटककार्यकर्ते) जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार

क्रीडा व खेळांच्या प्रचार प्रसार करणारे संघटक – कार्यकर्ते यांना मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद, लातूर, अमरावती व नागपूर यांना आठ विभागातून एक असे गौरव पत्र, मानचिन्ह व 1 लक्ष रुपयांचे आठ पुरस्कार आणि राज्यास्तरावर सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या एका  महिला क्रीडा संघटक – कार्यकर्ते यांना ‘जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार’ देण्यात येईल.

राज्य साहसी क्रीडा पुरस्कार

गिर्यारोहण, प्रस्तरारोहण, समुद्र-खाडी पोहणे, शिडाच्या होडीतून समुद्र प्रवास करणे, सायकल वरुन जग प्रवास, पॅराग्लाईडींग, पॅराजपिग आदी साहसी उपक्रमात सहभागी होवून आंतराष्ट्रीय दर्जाची कामगिरी करणाऱ्या एका व्यक्तीस गौरव पत्र, मानचिन्ह व 1 लक्ष रुपयांचा ‘राज्य साहसी क्रीडा पुरस्कार’ प्रदान करण्यात येईल.

एकलव्य राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू)-

क्रीडा क्षेत्रात विशेष उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्रातील दिव्यांग खेळाडूंना गौरव पत्र, मानचिन्ह व 1 लक्ष रुपयांचा ‘एकलव्य राज्य क्रीडा पुरस्कार’ प्रदान करण्यात येईल.

शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार

ज्येष्ठ क्रीडापटू, क्रीडा मार्गदर्शक, क्रीडा संघटक-कार्यकर्ते व क्रीडा क्षेत्राशी संबंधित 60 वर्षावरील व्यक्ती अशा ज्येष्ठ क्रीडा महर्षींना देण्यात येणाऱ्या गौरव पत्र, मानचिन्ह व 3 लक्ष रुपयांच्या ‘शिवछत्रपती जिवन गौरव पुरस्कार’साठी ज्येष्ठ क्रीडा महर्षींची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी व विभागीय उपसंचालक हे प्राप्त करुन सादर करतील. या पुरस्कारासाठी अर्ज मागवण्यात आलेले नाहीत.

अधिक माहितीसाठी याबाबत 16 ऑक्टोबर 2017 चा शासन निर्णय www.maharshtra.gov.in या शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संगणक संकेतांक 201710161812538321 असा आहे. तसेच क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, संबंधित विभागाचे क्रीडा व युवक सेवा विभागीय उपसंचालक अथवा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयांशी संपर्क साधावा असे आवाहन क्रीडा व युवक सेवा उपसंचालक चंद्रकांत कांबळे यांनी केले आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.