येवला :- (विलास कांबळे)प्रतिकूल परिस्थितीतुन गवसवली यशाची वाट. MPSC परीक्षेत सीमा खडांगळे राज्यात 17 वी.
येवला तालुक्यातील खरवंडी येथील सीमा काशिनाथ खडांगळे हिने महाराष्ट्रातून अनु जाती प्रवर्गातून MPSC चे PSI पद पहिल्याच प्रयत्नात मिळवले. यात तिचा राज्यात मुलींमध्ये 17 वा क्रमांक आला. तिला शुभेच्छा देण्यासाठी तालुक्याचे उपसभापती मा रुपचंदभाऊ भागवत यांचेसह देविदास जानराव, एकनाथ भालेराव, ज्ञानेश्वर भागवत, मनोज भागवत गेले. सीमा ने हे यश संपादन करण्यासाठी दिलेले योगदान व कधीकधी सुखाचा केलेला त्याग पाहून या संपूर्ण कुटुंबाला या यशाबद्दल भरभरून शुभेच्छा दिल्या. सीमाला उत्तरोत्तर आणखी प्रगती करण्यासाठी व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
○ज्याप्रमाणे नाशिक जिल्ह्यातील कोकण भागाकडे पेसा म्हणजेच दुर्गम, दुर्लक्षित भाग म्हणून पहिले जाते तसे येवला तालुक्यातील खरवंडी गाव. काशिनाथ फकिरा खडांगळे हे ऊसतोड कामगार होते. वडीलासह पाच चुलते असे पाच जणांचे एकत्रित कुटुंब. घरची परिस्थिती अतिशय बेताची. शेती पूर्णपणे पावसावर अवलंबून असल्याने आर्थिक सोर्स बेभरोशी त्यामुळे ऊसतोड सोडून दुसरा पर्याय नव्हता. त्यातून मुलांना शिकवून मोठे करायचे त्यांना पुन्हा शेतीकडे फिरकून देखील द्यायचे नाही कारण आम्ही ज्या यातना भोगतो आहोत त्या मुलांनी भोगू नये. घरात कुठलाही शैक्षणिक वारसा नसून देखील चुलते कारभारी खंडागळे यांची जबरदस्त इच्छाशक्ती व शिक्षणावरील विश्वास, भावनिक आधार, घरातील संस्कार तसेच ‘शिक्षण हे वाघिणीचे दूध असून जो पेइल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही’ हे डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, मोठे चुलते यांची हिंमत सीमासाठी प्रेरक ठरली.
○खरवंडी गावातील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिली ते चौथी प्राथमिक शिक्षण घेऊन सीमाने मनमाड येथे सेंट झेवियर मनमाड बोर्डिंग स्कूल मध्ये पाचवी ते दहावी पर्यंतचे शिक्षण घेतले. लहानपणापासून पोलीस खात्यात जायचे असा मानस होताच त्यासाठी पोलीस कॉन्स्टेबल भरती देखील केली व अवघ्या एक मार्काने हुलकावणी दिली. मात्र प्रयत्न न सोडता तिने स्पर्धा परीक्षेचा जोमाने अभ्यास सुरु केला व ज्या मैदानावर पोलीसाची नोकरी एका मार्काने गेली त्याच मैदानावर PSI ची फिजिकल परीक्षा दिली. तेव्हा गर्वाने मन उंच मात्र नक्की झाली. बी ए , एम ए इंग्लिश व इतिहास स्पेशल घेऊन नाशिक येथे पूर्ण केले. समाज कल्याण विभाग नाशिकच्या होस्टेल ला राहून अभ्यासाची तयारी केली. वसतिगृहात राहून गीते अभ्यासिकेत सकाळी ७ ते १० वाजेपर्यंत दिशाहीन अभ्यास करायचा. सीमा मुळात हुशार पण महत्वाचा अभ्यास कसा करावा हे तिला माहित नव्हते त्याच वेळी तिला मोठा भाऊ म्हणून मिळाला गणेश सास्ते. हाच तिचा गुरू देखील झाला. सद्या धर्मादाय आयुक्तामध्ये लेखापाल म्हणून असलेल्या गणेश सास्ते यांनी तिला अभ्यासाची दिशा दिली व खडतर प्रसंगी खडकसारखा तिच्यामागे उभा राहिला. प्रसंगी फॉर्म भरण्यासाठी पैसे नसतांना सास्ते तिला न माहित फॉर्म देखील परस्पर भरून देत असत. फुले, शाहू, आंबेडकर, डॉ अब्दुल कलाम यांचे विचार देखील तिच्यासाठी आदर्श होते. वडील, चुलते, भाऊ, आते मामा यांचा तिला खंबीर आधार होता. यांच्या जीवावरच मी या पदापर्यंत पोहचू शकले असा तिचा उदात्त विचार आहे.
○अभ्यास करत असतांना कधी समाजाच्या आप्तांच्या रोषाला सामोरे जावे लागत असे पण स्वतःवर ठाम विश्वास असल्याने तिने स्वतःला कधी डगमगू दिले नाही कि खचून गेली नाही. आपले प्रयत्न चालू ठेवतांना या गोष्टीकडे दुर्लक्ष केले. महाराष्ट्रात अनु जाती या राखीव जागेसाठी मुलींसाठी २९ जागा होत्या त्यात १४ व्या क्रमांकावर घवघवीत यश मिळवले. जि प शाळा मराठी माध्यमातून माझा पाया पक्का झाला व सर्व विषय मला पदवीपर्यंत अभ्यासायला मिळाल्याने मला खूप आनंद होतो आहे असे तिने मनोगत दिले. माझ्या या यशामागे ग्रामस्थ, मित्रमंडळ, पाहुणे, यांचा देखील मोलाचा वाटा आहे व त्यांची मी आयुष्यभर ऋणी राहील तसेच यांच्या या सहकार्यामुळेच मी PSI झाले व यापुढे तहसीलदार होण्याचं माझं स्वप्न आहे व मी तहसीलदार होणारच असा आत्मविश्वास व पुढील ध्येय तिने सांगितले.
अतिशय बिकट व प्रतिकूल परिस्थिती, पाठीमागे कुठलेही आर्थिक, शैक्षणिक पाठबळ नसतांना पैशाअभावी कुठलीही करिअर ऍकॅडमी जॉईंट न करता मिळवलेले हे यश खरच ग्रामीण भागातील तरुणांसाठी व तारुणींसाठी प्रेरणादायी आहे. गरीब परिस्थितीतून मुलगी शिकवणे व समोरच्या परिस्थितीला तोंड देणे. किती अवघड असते हे त्या कुटुंबाकडे गेल्यावर समजले. अनुकूल परिस्थिती असतांना शिक्षण घेण्यास टाळाटाळ करणारे तरुण तरुणी आणि प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग शोधत दुर्गम भागातून मुलगी म्हणून शिकवणे व समाजाच्या रोषाला समोर जाणं खरच किती विरोधाभास, पण हा आदर्श नक्कीच गावाकडच्या लोकांना तरुणांना घेण्यासारखा आहे. सीमा खडांगळे हिचा गावासाठी व तरुण पिढी योग्य मार्गाने चालवण्यासाठी, मुली देखील आपली मान गर्वाने उंच करू शकतात हि भावना रुजवण्यासाठी संपूर्ण तालुक्यातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, पुढाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी तिचा अध्ययन अनुभव आपल्या गावासाठी उपलब्ध करून द्यावा.*
रुपचंद रामचंद्र भागवत, उपसभापती पंचायत समिती येवला.हे यश मिळवण्यामागे मला घराच्या सदस्यांनी केलेली मदत, कधीकधी केलेल्या सुखाचा त्याग मी कधीच विसरू शकत नाही. लोकांचे उपरोधिक बोलणे मला इथपर्यंत घेऊन आले. आज माझ्या पावलांवर पाऊल ठेऊन अनेक तरुण तरुणी चालू शकतात. माझ्या वाटेत जे काटे आले ते मी उचलून बाजूला केले. तसे माझ्यामागे पाऊलवाट शोधणाऱ्यांना असे काटे आडवे राहणार नाही. खंत एका गोष्टीची वाटली कि, एखादी तरुणी स्वःकष्ठाच्या जोरावर यशस्वी झाली. म्हणून माझ्या पाठीवर थाप मारून लढ म्हणायचा मोठेपणा गावातील कोणत्याही पुढाऱ्यांनी किंवा पदाधिकाऱ्यांनी दाखवला नाही. माझे मनोबल वाढवण्यासाठी तालुक्यातून कोणताही पुढारी किंवा पदाधिकारी पुढे आला नाही. पण रुपचंदभाऊ यांनी तो मनाचा मोठेपणा दाखवून मला शुभेच्छा दिल्या, माझे मनोबल वाढवले, मला लढण्याची हिम्मत दिली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद.*>सीमा खंडागळे, खरवंडी ता येवला.’मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवूनी फक्त लढ म्हणा.’ या काव्यपंक्तीप्रमाणे अशिक्षित कुटुंबाला वेळोवेळी समाजाने डिवचले, परिणामी घरात कितीही अडचण काढायची पण मुलांना, मुलींना उच्च शिक्षण द्यायचे. मुलांनी देखील माझ्या या इच्छाशक्तीला दाद देत मनापासून शिक्षण घेतले व गर्वाने आमची मान उंचावली. त्यांना खूप शुभेच्छा व येवला पंचायत समिती उपसभापती मा रुपचंदभाऊ भागवत यांनी घरी भेट देऊन सीमाच्या पाठीवर थाप मारून आणखी मोठी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या व मनात असलेली पुढ्याऱ्यांविषयी असलेली खंत भरून काढली.
कारभारी फकिरा खंडागळे, चुलते खरवंडी