ylliX - Online Advertising Network

बापट यांच्या पोटात असलेले ओठावर आले : संजय राऊत

गिरीश बापट यांच्या आश्चर्यकारक विधानावर प्रतिक्रिया

नाशिक : गिरीश बापट भाजपचे ज्येष्ठ मंत्री आहेत, अस्सल पुणेकरही आहेत. त्यांच्या पोटात असलेले ओठावर आले असून त्यांच्या मताशी सहमत आहे. ते जे बोलले असतील ते खरच आहे, अशी बोलकी प्रतिकिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे.

“आता केवळ एक वर्ष राहिलं आहे, त्यामूळे आपल्या मागण्या मांडा.’ ह्या अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांच्या वक्‍तव्याविषयी त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर आलेल्या राऊत यांनी बुधवारी नाशिकमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

राज्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र अजूनही सुरु आहे. राज्यातला बळीराजा नष्ट होत चालला असतांना शेतकऱ्यांच्या हक्‍कांसाठी कायदा करायला हवा. कृषी खात्याचे वेगळे अर्थसंकल्प असावेत. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर विशेष सत्र आयोजनाची पी. साईनाथ यांची मागणी योग्य असल्याचे त्यांनी सांगितेले.

सरकार तीन तलाखच्या विषयावर विशेष सत्र बोलावले जाऊ शकते तर मग शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर विशेष सत्राचे आयोजन का केले जाऊ नये? असा सवाल त्यांनी केला.

नाशिकमध्ये सध्या राजकीय मिसळ पार्ट्याचे जोरदार आयोजन केले जात आहे. यावर बोलतांना त्यांनी सांगितले की, मिसळ पार्ट्यांचे आयोजन चांगली बाब असून आपणही शनिवारी होत असलेल्या मिसळ पार्टीत सहभागी होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

हल्ली महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू नाशिक झाला आहे. उत्तर महाराष्ट्राच्या ताकदीवर आम्ही सत्तेवर येऊ, असा विश्‍वास त्यांनी यावेळी व्यक्‍त केला.

भीमा कोरेगावच्या घटनेविषयी ते म्हणाले, की पुण्यात एल्गार परीषदेत उमर खालीदला कोणी बोलवले, याचा शोध घेतला जावा. देशाचे तुकडे व्हावे, अशी इच्छा ठेवणाऱ्यांना शनिवार वाड्यावर वातावरण गढूळ करण्यासाठी बोलवले. त्यामूळे केवळ हिंदूत्ववाद्यांवर आरोप करुन चालणार नाही, तर खऱ्या दोषींवर कारवाई व्हावी अशी मागणी त्यांनी केली.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.