ylliX - Online Advertising Network

सांगरखेडाचे अश्व संग्रहालय ठरेल जगातील पर्यटकांचे आकर्षण: मुख्यमंत्री

नंदुरबार तब्बल 300 वर्षांची परंपरा असलेल्या सारंगखेडा येथीलयात्रोत्सव आणि अश्व बाजार पर्यटकांचे आगामी काळात आकर्षण ठरणार आहे. तसेच अश्व संग्रहालय देशविदेशातील अश्वप्रेमी व पर्यटकांचे आकर्षण ठरेल. नंदुरबार जिल्ह्यातील पर्यटनस्थळांचा विकास करुन रोजगार निर्मितीवर भर देण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.

सारंगखेडा, ता. शहादा, जि. नंदुरबार येथे यात्रोत्सवानिमित्त आयोजित चेतक फेस्टिव्हलनिमित्त मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते अश्वसंग्रहालयाचे भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी राज्याचे पर्यटन, रोजगार हमी योजना व नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल, खासदार डॉ. हीना गावित, आमदार डॉ. विजयकुमार गावित, चेतक फेस्टिवल समितीचे अध्यक्ष जयपाल रावल, जिल्हा परिषद सदस्या ऐश्वर्या रावल, सरपंच भारतीताई कोळी, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रे, नाशिक विभागीय महसूल आयुक्त महेश झगडे, प्रभारी जिल्हाधिकारी अनिल पाटील, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे, सहव्यवस्थापकीय संचालक आशुतोष राठोड, महाव्यवस्थापक स्वाती काळे, विक्रांत रावल, रेखा चौधरी, आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, सारंगखेडा येथील चेतक महोत्सवासाठी पर्यटन मंत्री जयकुमार रावल, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे अधिकारी यांनी परिश्रम घेत कमी कालावधी आयोजित फेस्टिव्हल कौतुकास्पद आहे. जिल्हा माहिती कार्यालय, धुळे यांच्यातर्फे प्रकाशित होणाऱ्या यशार्थच्या माध्यमातून या महोत्सवाचे संदर्भ थेट महाभारत काळात असल्याचे समजले.

घोड्यांबद्दल सर्वांनाच आकर्षण आहे. चेतक फेस्टिवल आगामी काळात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचेल. येथे होणाऱ्या अश्व संग्रहालयानिमित्त अतिप्राचीन, प्राचीन काळापासून आजपर्यंतचा घोड्यांचा इतिहास, घोड्यांच्या वेगवेगळ्या प्रजाती, त्यांचे ब्रीडिंग यासह घोड्यांबद्दलच्या विविध गोष्टी येथे येणाऱ्या पर्यटकांना अश्व संग्रहालयाच्या माध्यमातून समजतील. त्यामुळे येथे घोडा विकास व संशोधन केंद्र,पशुचिकित्सालय कार्यान्वित करण्याबाबत विचार केला जाईल. पर्यटन हा सर्वाधिक रोजगार देणारा व्यवसाय आहे. या व्यवसायातून सामान्यातील सामान्य माणसाला रोजगार उपलब्ध होवू शकतो. त्यामुळे अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल. त्यामुळे चेतक महोत्स्व राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाईल. पर्यटन मंत्री श्री. रावल यांनी पर्यटन विभागाचा कायापालट केला आहे. त्यांना पर्यटनाचे चांगले व्हीजन आहे. त्यांचे काम अभिनंदनीय आहे, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.

तापी नदी काठावरील तीर्थक्षेत्र प्रकाशेच्या विकासासाठी 13 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. त्यासह तोरणमाळच्या विकासासाठी 5 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. तसेच 2 शनिमांडळ, रावलापाणी या स्थळांचा विकास होवून पर्यटन व्यवसायाची वृध्दी होईल यासाठी प्रयत्न केले जातील. तापी नदीवरील बॅरेजमुळे सारंगखेडा येथे जलसाठा निर्माण झाला आहे. येथे साहसी जलक्रीडा प्रकार सुरू केले जातील. त्यामुळे या भागात पर्यटनाचे वर्तुळ तयार होईल.

जगातील पर्यटकांना आदिवासी संस्कृतीचे मोठे आकर्षण आहे. नंदुरबार जिल्ह्यातील होळी महोत्सव पर्यटकांसाठी पर्वणी ठरेल. त्यामुळे या कालावधीत देशविदेशातील पर्यटक येण्यासाठी ब्रॅडिंग करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री महोदयांनी सांगितले. तसेच तापी नदीवरील उपसा सिंचन योजनांबाबत 15 दिवसांत बैठकीचे आयोजन करुन शेतीपर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले.

पर्यटन मंत्री श्री. रावल म्हणाले, सारंगखेडा येथील यात्रोत्सव म्हणजे बहुआयामी यात्रोत्सव आहे.यात्रेच्या माध्यमातून येथील परंपरा, संस्कृती सर्वोच्च पदाला नेण्याचे प्रयत्न असून जगासमोर येण्यास मदत होईल. सारंगखेडा बॅरेज येथे वॉटर स्पोर्ट विकसित करण्यात येईल. याशिवाय प्रकाशे, रावलापाणी, तोरणमाळ,नंदुरबारचा इमाम बादशाह दर्गा विकसित करण्यात येईल. त्यामुळे जिल्ह्यातील शेकडो युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. राज्यातील ऐतिहासिक, भौगोलिक, सांस्कृतिक पर्यटन स्थळे, अभयारण्य याविषयी जनजागृतीची मोहीम राबविण्यात येईल. त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्रात सर्वाधिक पर्यटक येतील, असा विश्वास पर्यटन मंत्री श्री. रावल यांनी व्यक्त केला.

आमदार डॉ. गावित यांनी सांगितले, सारंगखेडा महोत्सवाला धार्मिक व ऐतिहासिक असे महत्व आहे. येथे घोडे व्यापारी व खरेदीदार मोठ्या संख्येने येतात. येथील परंपरा व संस्कृती संवर्धनासाठी भाविक येथे येतात. अश्व संग्रहालयाच्या माध्यमातून येथील घोडे बाजाराची माहिती जगासमोर येण्यास मदत होईल. त्याबरोबरच जिल्ह्यातील धार्मिक, ऐतिहासिक व भौगोलिक पर्यटनस्थळांचा विकास व्हावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

पर्यटन विभागाचे प्रधान सचिव श्री. गद्रे म्हणाले, महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा शोध घेवून त्यांचा विकास करीत तेथे पर्यटकांना पायाभूत सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करण्यात येतो. सारंगखेडा येथील चेतक फेस्टिव्हलच्या माध्यमातून हा परिसर जगासमोर आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील.सारंगखेडा फेस्टिव्हल आगळा- वेगळा असल्याचेही त्यांनी नमूद केले.

अश्व संग्रहालयाचे भूमिपूजन

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते आज सकाळी अश्व संग्रहालयाचे भूमिपूजन झाले. यावेळी पर्यटन मंत्री श्री. रावल, खासदार डॉ. गावित, आमदार डॉ. गावित, पर्यटन व सांस्कृतिक विभागाचे प्रधान सचिव श्री. गद्रे, नाशिक विभागीय महसूल आयुक्त श्री. झगडे यांच्यासह पर्यटन विभागाचे अधिकारी, जिल्ह्याचे वरीष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अश्व कसरतींची पाहणी

चेतक फेस्टिव्हलनिमित्त येथे घोड्यांचा व्यापार भरलेला आहे. यानिमित्त घोडे व्यावसायिक अनेक थरारक कसरती करतात. या कसरतींची अत्याधुनिक आणि वातानुकूलीत अशा प्रेक्षक गॅलरीतून मुख्यमंत्री श्री.फडणवीस, पर्यटन मंत्री श्री. रावल यांच्यासह लोकप्रतिनिधी, अधिकारी यांनी पाहणी केली. मुख्यमंत्री महोदयांनी या व्यावसायिकांच्या कसरतीबद्दल कौतुकोद्गार काढले.

एकमुखी दत्तमंदिरात दर्शन

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे कळंबू रस्त्यावरील बीज गुणन केंद्राजवळील हेलिपॅडवर आज सकाळी आगमन झाले. त्यानंतर त्यांनी एकमुखी दत्तमंदिरात जावून दर्शन घेतले. यावेळी पर्यटन मंश्री. रावल यांच्यासह लोकप्रतिनिधी, अधिकारी उपस्थित होते.

चित्र प्रदर्शनाची पाहणी

चेतक फेस्टिव्हलनिमित्त येथे अश्वांवर आधारीत चित्र व छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे.या प्रदर्शनाची मुख्यमंत्री श्री. फडणवीस, पर्यटन मंत्री श्री. रावल, खासदार डॉ. गावित, आमदार डॉ. गावित,जयपालसिंग रावल आदींनी पाहणी केली. या प्रदर्शनात जिल्हा माहिती कार्यालय, धुळे यांच्यातर्फे प्रकाशित होणाऱ्या ई- डिजिटल साप्ताहिक यशार्थने सारंगखेडा येथील यात्रोत्सवावर लिहिलेल्या अंकाचे स्वतंत्र दालन लावण्यात आले आहे. या दालनाची जिल्हा माहिती अधिकारी रणजितसिंह राजपूत यांनी मान्यवरांना माहिती दिली.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.