घटनास्थळ आणि जिल्हा रुग्णालय परिसरात पोलीस बंदोबस्त
नाशिकच्या अंबड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अंबड परिसरातील महालक्ष्मी नगर (डीजीपी नगर २) येथे साहेबराव नींबा जाधव या रिक्षा चलाकाचा लाकडी दंडुक्याने मारहाण करत खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. rickshaw driver killed dgp nagar2 nashik police bandobast civil hospital
३१ वर्षीय रिक्षाचालकाची हत्या झाल्याचे समजताच अंबड पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मारेकऱ्यांचा शोध घेतला जात असून अंबड पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

डीजीपी नगर २ परिसरात साहेबराव आणि काही अज्ञात व्यक्तींसोबत वाद झाला. त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले आणि टोळक्याने साहेबराव याला दंडुक्याने मारहाण केली. यात जाधव गंभीर जखमी झाला. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले.
जाधव यांच्या भावाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार फोनवर तसेच सोशल मिडियावर जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याचे समजते. त्यानुसार तपास केला जात असून पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेत त्याच्याकडून माहिती घेऊन इतरांचा शोध घेतला जात आहे. परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे, अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक मधुकर कड तपासाची चक्रे फिरवत आहेत.
दरम्यान, मयताच्या नातेवाइकांनी संशयितांना ताब्यात घेतल्याशिवाय शव ताब्यात घेणार नसल्याची भूमिका घेतल्याने घटनास्थळ आणि जिल्हा रुग्णालय परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.