भाम सिंचन प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडवण्यास प्राधान्य – केंद्रीय जलसंपदा राज्यमंत्री डॉ. संजीवकुमार बालियान
नाशिक : प्रतिनिधी वाकी खापरी धरणाचे बांधकाम करतांना जलसंपदा अधिकाऱ्यांनी आपले कौशल्य वापरून उत्तम काम केले आहे. धरणग्रस्तांचे अजूनही काही प्रश्न अनुत्तरित असतील तर शासनदरबारी ते सोडवण्यासाठी कटिबद्ध आहोत असे प्रतिपादन केंद्रीय जलसंपदा राज्यमंत्री ना. संजीवकुमार बालियान यांनी केले.
भाम धरण प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या पुनर्वसनातील समस्या दूर करण्यास प्राधान्य देण्यात येईल, असे प्रतिपादन केंद्रीय जलसंपदा, नदीविकास व गंगा शुध्दीकरण राज्यमंत्री डॉ. संजीवकुमार बालियान यांनी केले.प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतील इगतपुरी तालुक्यातील भाम व वाकी धरण प्रकल्पांच्या कामांची पाहाणीसाठी जिल्हा दौऱ्यावर आले होते. याप्रसंगी भाम प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांवर उत्तर देताना मंत्रीमहोदय बोलत होते. यावेळी जलसंपदा विभागाच्या आमदार निर्मला गावित, अधिक्षक अभियंता अलका अहिरराव, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) मधुमती सरदेसाई, उपविभागीय अधिकारी राहूल पाटील, माजी आमदार शिवराम झोले आदी उपस्थित होते.
केंद्रीय राज्यमंत्री म्हणाले, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतून देशात 96 सिंचन प्रकल्प होत असून त्यातील 26 सिंचन प्रकल्प महाराष्ट्रात आहेत. भाम धरण प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण करण्यात येईल. या धरण प्रकल्पांच्या कामाबरोबरच यासाठी जमीन दिलेल्या शेतकऱ्यांच्या पुनर्वसनाला प्राधान्य देण्यात येईल. भाम धरण प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्यांसाठी पुनर्वसित गावठाणामध्ये वीज, पाणी पुरवठा, रस्ते, सार्वजनिक सभामंडप आदी सर्व पायाभूत सुविधा उभारण्यात येतील. कामांच्या दर्जाबाबत कोणतीही तडजोड करण्यात येऊ नये आणि शेतकऱ्यांच्या अडी अडचणी सोडविण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वत: लक्ष देण्याचे निर्देश श्री. बालियान यांनी दिले.
याप्रसंगी आमदार श्रीमती गावित आणि उपस्थित आदिवासी शेतकरी, गावकरी, लोकप्रतिनिधी आदींनी प्रनर्वसन प्रश्नांबाबत मागण्या मांडल्या. यावेळी पुनर्वसित गावठाणात उभारण्यात येणाऱ्या सभामंडप परिसरात वृक्षारोपण केले.वाकी खापरी धरण पहाणीप्रसंगी धरणग्रस्त कृती समितीच्या वतीने ऍड. रतनकुमार इचम यांनी विविध समस्या मांडणारे निवेदन मंत्र्यांना दिले. धरणाचे पाणी या भागासाठी राखीव करण्याबाबत तातडीने अभ्यास करून निर्णय घेण्यात येईल. या भागात प्रामुख्याने ” किसान भवन ” निर्मित करून त्या माध्यमातून धरणग्रस्तांना वेगळे व्यासपीठ निर्माण करण्यासाठी कृतिशील राहू असे आश्वासन मंत्रीमहोदयांनी ऍड. इचम यांना दिले.
भाम धरणाच्या भेटीप्रसंगी या भागातील धरणग्रस्त ग्रामस्थांनी आपल्या अनेक मागण्यांबाबत कैफियत मांडली. ना. बालीयान यांनी याबाबत संबंधित अधिकारी आणि नाशिकचे जिल्हाधिकारी यांच्यासोबत चर्चा करून समस्या सोडवण्याचा शब्द दिला. माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांनीही आपल्या मागण्या मांडल्या.
डॉ. संजीवकुमार बालियान यांनी केली वाकी धरण प्रकल्पाची पाहाणी
राज्यमंत्री डॉ. संजीवकुमार बालियान यांनी वाकी धरणाची पाहाणी केली. यावेळी उपस्थित अधिकारी, लोकप्रतिनिधी व शेतकऱ्यांबरोबर चर्चा केली. नांदुर मध्यमेश्वर प्रकल्पांतर्गत इगतपुरी तालुक्यात भाम धरण व वाकी धरण आहेत. भाम नदीवरील 518 कोटी रुपये खर्चाच्या भाम धरणाची साठवण क्षमता 2.66 टीएमसी असून मार्च 2018 अखेर प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहे. 2.06 टीएमसी क्षमतेचे वाकी धरण पूर्ण झाले असून दारणा नदीवर उभारलेले आहे.