लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत उन्हाळ कांद्यापाठोपाठ आता लाल कांद्याच्या दरात वाढले आहेत. बाजार समितीच्या आवारात ८१५२ रुपये प्रति क्विंटल इतका सर्वोच्च दर मिळाला.(Onion Rate)
दुसरीकडे देशांतर्गत मागणीच्या तुलनेत पुरवठा नाही. त्यामुळे केंद्र सरकारने इजिप्त आणि तुर्की या दोन देशातून १७ हजार मेट्रिक टन कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला आहे.
डिसेंबरच्या शेवटी आणि जानेवारीच्या सुरुवातीस देशांतर्गत कांदा दाखल होणार आहे. दरम्यान लाल कांद्याची मोठ्या प्रमाणात देशांतर्गत आवक होणार आहे. त्यामुळे आगामी दिवसात दोन्ही कांदे एकाच वेळी बाजारात दाखल झाले तर कांद्याचे बाजार भाव मोठ्या प्रमाणात कोसळतील आणि याचा फटका भारतीय कांदा उत्पादकांना बसण्याची भीती या क्षेत्रातील तज्ञांनी व्यक्त केली आहे.
शुक्रवार दि २९ नोव्हेंबर च्या तुलनेत लाल कांद्याच्या कमाल दरात सोमवारी १६२७ रुपयांची वाढ झाली आहे. उन्हाळ कांद्याची आवक जवळपास संपत आली असून,आता येथील बाजार समितीच्या आवारात लाल कांद्याची आवक वाढत आहे.
सोमवारी लाल कांद्याची १८५० क्विंटल आवक होऊन प्रति क्विंटलला कमीत कमी २००० रु,जास्तीत जास्त ८१५२ रु तर सरासरी ७१०० रु प्रति क्विंटल असा भाव मिळाला. लासलगाव बाजार समितीत २०१५ मधील लाल कांद्याला उच्चांकी असा ६३०० रुपये बाजार भावाचा विक्रम मोडीत काढत ८१५२ रुपये इतक्या उच्चांकी बाजार भावाची आज ऐतिहासिक नोंद झाली.
सध्या बाजारपेठेत वाढलेले कांद्याचे भाव आणखी महिनाभर तेजीतच राहतील असे येथील कांदा व्यापारी बोलत आहे. नवीन लाल कांदा पुरेश्या प्रमाणात बाजारात येण्यासाठी आणखी एक ते दीड महिना वाट पाहावी लागणार आहे. (Onion Rate)