ylliX - Online Advertising Network

कांदा निर्यात प्रोत्साहन योजनेला ३० जून २०१७ पर्यंत मुदतवाढ

कांदा निर्यातदारांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र शासनाने सुरू केलेल्या कांदा निर्यात प्रोत्साहन योजनेला ३० जून २०१७ पर्यंत मुदतवाढ मिळालेली आहे.या संदर्भत लासलगाव बाजार समिती सभापती जयदत्त होळकर यांनी शासनाला पत्र पाठवून कांदा निर्यात प्रोत्साहन योजनेची मुदतवाढ करण्याची मागणी केलेली होती.
केंद्र शासनाच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयातील वाणिज्य विभागाच्या विदेश व्यापार महानिदेशालयाने 26 ऑगस्ट 2016 ला प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार भारतातून व्यापारी वस्तूंच्या निर्यातीसंबंधी असलेल्या निर्यात प्रोत्साहन योजनेंतर्गत पाठविण्यात येणाऱ्या कांद्यास 5 टक्के एमईआयएस दर लागू राहील, असे केंद्र शासनाने जाहीर केले होते. मात्र, या योजनेची मुदत मार्च २०१७ अखेर संपणार असल्याने केंद्र शासनाने या योजनेला मुदतवाढ द्यावी, यासाठी लासलगाव बाजार समितीने केंद्र व राज्य शासनाकडे मागणी केली होती. मागणीच्या अनुषंगाने शासनस्तरावर बैठक होऊन कांद्याचे दर स्थिर राहण्यासाठी जास्तीत जास्त कांद्याची निर्यात व्हावी यादृष्टीने केंद्र शासनाने योजनेला मुदतवाढ दिली आहे.
सध्या लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील इतर बाजार समित्यांत मोठ्या प्रमाणावर कांद्याची आवक होत आहे.  अशा परिस्थितीत केंद्र शासनाने या योजनेस मुदतवाढ दिल्याने केंद्र शासनाच्या या निर्णयामुळे राज्यातील कांदा उत्पादक व निर्यातदारांना आंतरराष्ट्रीय बाजारात कांद्याला बाजार मिळविणे व इतर देशांना स्पर्धा करणे शक्‍य होणार आहे. कांदा निर्यातीत वाढ होऊन आगामी काळात कांदा बाजारभावात सुधारणा होण्याची शक्‍यता आहे.
सध्या लासलगांवसह नाशिक जिल्ह्यातील इतर बाजार समित्यांमध्ये लेट खरीप (रांगड्या) व रब्बी (उन्हाळ) कांद्याची आवक होत असुन एकट्या लासलगांव बाजार समितीत दररोज २० ते २५ हजार क्विंटल कांद्याची आवक होत आहे. सध्या लासलगांव येथे लाल कांदा कमीत कमी रू. ३५०/-, जास्तीत जास्त रू. ५०२/- व सरासरी रू. ४००/- प्रती क्विंटल दराने तर उन्हाळ कांदा कमीत कमी रू. ४००/-, जास्तीत जास्त रू. ६४१/- व सरासरी रू. ५८०/- प्रती क्विंटल दराने विक्री होत आहे. रांगड्या (लाल) कांद्याचा हंगाम संपुष्टात आल्याने व नविन उन्हाळ कांद्याची आवक सुरू झाल्याने शेतकरी बांधव शिल्लक राहीलेला रांगडा (लाल) कांदा विक्रीस प्राधान्य देत आहे. त्यामुळे येथील बाजार समितीच्या बाजार आवारांवर कांदा आवक टिकुन आहे. उन्हाळ कांद्याच्या आवकेत वाढ होत असुन सदरचा कांदा टिकाऊ व निर्यातक्षम असल्याने येथील निर्यातदारांना कांदा निर्यातीस वाव आहे. अशा परीस्थितीत केंद्र शासनाने सदर योजनेस दि. ३० जून, २०१७ पर्यंत मुदतवाढ दिल्याने कांदा भाव हे काही प्रमाणात का होईना शेतकऱ्यांना दिलासा देतील अशी शक्यता आहे.
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.