ylliX - Online Advertising Network

Chandni Chowk of Pune या दिवशी पाच सेकंदांत पुण्याच्या चांदणी चौकातील पूल होणार जमीनदोस्त

चांदणी चौकातील वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी अडथळा ठरत असलेल्या पुलाला पाडण्याचा मुहूर्त अखेर ठरला असून २ ऑक्टोबरच्या पहाटे २ वाजता हा पूल तुकड्यांमध्ये पाडला जाणार आहे. त्यासाठी १ ऑक्टोबरच्या रात्री ११ वाजल्यापासून २ ऑक्टोबरच्या सकाळी ८ वाजेपर्यंत हा महामार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली. यासाठी नियोजन पूर्ण झाले आहे. केवळ ५ सेकंदांमध्ये हा पूल पाडण्यात येणार आहे.Chandni Chowk of Pune

या नियोजनाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी संबंधित यंत्रणांची बैठक झाली. त्यात जिल्हा प्रशासन, राष्ट्रीय महामार्ग प्रशासन, वाहतूक पोलीस यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या नियोजनाबाबत देशमुख यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. याबाबत देशमुख म्हणाले, “हा पूल पाडण्यापूर्वी येथील सर्व सेवा वाहिन्या स्तलांथरीत करण्यात आल्या आहेत. तसेच पूल पाडल्यानंतर तयार होणाऱ्या वाढीव लेनसाठी सर्व भूसंपादन पूर्ण झाले आहे. जमिनीच्या एका छोट्या तुकड्यासाठी संबंधित जमीन मालक सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत. हा अपवाद वगळता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सुचविलेली सर्व जमीन ताब्यात आली आहे. हा पूल पाडण्यापूर्वी वाहतुकीचे नियोजन पूर्ण करण्यात आले आहे. १ ऑक्टोबरच्या रात्री ११ वाजल्यापासून २ ऑक्टोबरच्या सकाळी ८ वाजेपर्यंत हा मार्ग वाहतुकीसाठी पूर्ण बंद करण्यात येणार आहे. पूल पाडण्यासाठी शनिवार हा कमी वाहतुकीचा दिवस निवडण्यात आला आहे. तसेच रात्री वाहतूक तुलनेने कमी असल्याने रात्री वेळ योग्य असल्याचे संबंधित यंत्रणांचे म्हणणे होते. त्यानुसार ही वेळ निश्चित करण्यात आली आहे. या काळात वाहतूक पोलिस तसेच पुणे व पिंपरीचे पोलिस उपस्थित राहतील.”

चांदणी चौकातील जूना उड्डाणपूल पाडण्याबाबत संबंधित यंत्रणांची बैठक झाल्यानंतर वाहतूक पोलीस उपआयुक्त राहुल श्रीरामे यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, ‘१ ऑक्टोबर रोजी रात्री ११ ते २ ऑक्टोबर सकाळी आठ या कालावधीत चांदणी चौकातील वाहतूक पूर्णपणे थांबविण्यात येणार आहे. या कालावधीत मुंबईकडून येणारी जड वाहतूक तळेगाव दाभाडे पथकर नाक्याच्या (टोल नाका) अलीकडे, तर साताऱ्याकडून येणारी जड वाहतूक खेड-शिवापूर परिसरात थांबविण्यात येणार आहे. पूल पाडण्याच्या कामासाठी वाहतूक बंद कालावधीत केवळ हलक्या वाहनांसाठी मुंबईकडून साताऱ्याकडे आणि साताऱ्याकडून मुंबईकडे जाण्यासाठी तीन पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. मात्र, या कालावधीत नागरिकांनी शक्यता प्रवास टाळावा. काही अत्यावश्यक कारणांसाठी प्रवास करायचा असल्यास पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आले आहेत.’

चांदणी चौक

मुंबईकडून साताऱ्याकडे जाणारी हलकी वाहने जून्या पुणे-मुंबई पथकर नाक्यावरून (टोल नाका) सोमाटणे फाटा, देहू रोड, भक्ती-शक्ती चौक, नाशिक फाटा, खडकी, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय (सीओईपी) चौक, संचेती रुग्णालय, स. गो. बर्वे चौक (म़ॉडर्न कॅफे चौक), जंगली महाराज रस्ता, खंडुजी बाबा चौक, टिळक चौक, स्वारगेट, सातारा रस्ता, कात्रज चौकातून साताऱ्याकडे जाऊ शकणार आहेत. तसेच मुंबईवरून वाकड येथे आल्यानंतर राजीव गांधी पूलावरून औंध, आनंदऋषीजी चौक (सावित्रीबाई फुले विद्यापीठासमोरील चौक), संचेती रुग्णालय, स. गो. बर्वे चौक, जंगली महाराज रस्ता, टिळक चौक, स्वारगेट, सातारा रस्त्यावरून साताऱ्याकडे मार्गस्थ होतील. याशिवाय मुंबईवरून बाणेर येथे आल्यानंतर विद्यापीठ चौक, संचेती रुग्णालय, स. गो. बर्वे चौक, जंगली महाराज रस्ता, टिळक चौक आणि स्वारगेटवरून सातारा रस्त्यावरून साताऱ्याकडे जाता येणार आहे.

दरम्यान, हलक्या वाहनांसाठी साताऱ्याकडून मुंबईकडे जाताना जुना बोगदामार्गे कात्रज-स्वारगेट-टिळक चौक-शिवाजीनगर-विद्यापीठ चौकातून बाणेर किंवा पाषाण किंवा औंध रस्त्यावरून थेट महामार्गावर मुंबईच्या दिशेने जाऊ शकतील. साताऱ्याकडून मुंबईकडे जाताना दुसरा पर्यायी रस्ता नवले पूल, वडगाव पूल, सिंहगड रस्ता, राजाराम पूल, स्वर्गीय राजा मंत्री पथावरून (डीपी रस्ता), नळस्टॉप, पौड फाटा, विधि महाविद्यालय रस्ता, सेनापती बापट मार्ग, विद्यापीठ चौक आणि तेथून बाणेर किंवा पाषाण किंवा औंध रस्त्यावरून महामार्गावरून मुंबईकडे जाता येईल किंवा साताऱ्याकडून मुंबईकडे जाताना तिसरा पर्यायी रस्ता वारजे पूल, कर्वे रस्त्याने आंबेडकर चौक, वनदेवी, कर्वे पूतळा चौक, पौड फाटा, विधि महाविद्यालय रस्ता, सेनापती बापट मार्ग, विद्यापीठ चौक आणि तेथून बाणेर किंवा पाषाण किंवा औंध रस्त्यावरून महामार्गावरून मुंबईकडे जाता येईल, असे श्रीरामे यांनी सांगितले.Chandni Chowk of Pune

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.