शहराचा सर्वकष वाहतूक आराखडा : वाहतुकीचे नियमन गरजेचे, सुचवल्या अनेक उपाययोजना

नाशिक शहरातील अस्तित्वात असलेल्या वाहनांची संख्या, प्रत्येक रस्त्यावरील वाहतुक घनता, रस्त्याची वाहतूक क्षमता, नागरीकांची आर्थिक स्थिती व क्षमता, वाहतूकीची पध्दत, राहणीमानाचा स्तर या सर्व बाबींचा अभ्यास करुन व प्रत्यक्ष वाहतुक सर्वेक्षणावरुन शहराचा सर्वकष वाहतूक आराखडा (CTTP) तयार करण्याचे काम अर्बन मास ट्रान्झीट कंपनी लिमिटेड, दिल्ली या सल्लागार संस्थेस देण्यात आले होते. सदर सल्लागार संस्थेने नाशिक शहरातील संपुर्ण वाहतूकीचे सर्वेक्षण करुन नाशिक शहराचा सर्वकष वाहतूक आराखडा (मसुदा) तयार केला आहे. सदर सर्वकष वाहतूक आराखड्यातील (मसुदा) प्रमुख बाबींचे सादरीकरण बुधवारी 7 जून रोजी  नाशिक महानगरपालिकेला केले आहे.

सद्यस्थितीत नाशिक शहराची सन 2011चे जनगणनेनुसार लोकसंख्या 14.86 लक्ष इतकी असून नाशिक शहर भारतातील 29 वे मोठे शहर असून महाराष्ट्रातील 4 थ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. सन 2016 पावेतो शहरात एकुण 7.32 लक्ष इतकी वाहने नोंदनीकृत असून शहरातील रस्त्यांवर धावत आहेत. या मोठ्या वाहनसंख्येचा ताण शहरातील प्रमुख रस्त्यांवर पडत असून शहरातील रस्त्यांची वाहतूक घनता मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. त्यामुळे शहरातील रस्त्यांवर वाहनांची कोंडी व अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर झाल्याचे प्रत्ययास येत आहे. यास्तव तज्ञ सल्लागार कंपनीने शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत सुधारणा त्वरेने होणेबाबत सुचित केले आहे.

सध्या शहरात  सार्वजनिक वाहतूक व्यवस्था महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांचेमार्फत चालविणेत येत असून शहरात 243 बसेस धावत आहेत. शहरातील लोकसंख्येचा विचार करता शहरात एकुण 698 बसेसची आवश्यकता असतांना धावत असलेल्या 243 बसेसची संख्या अत्यंत तोकडी आहे. सदर बस संख्येमध्ये तातडीने 455 बसेसची भर घालून शहर बस वाहतूक व्यवस्था सुधारणा करणे अत्यावश्यक आहे.

शहरातील मध्यवर्ती व गजबजलेल्या कमी रुंदी असलेल्या रस्त्यांसाठी छोट्या आकाराच्या मिनी बसेस चालविण्याची व बस मार्गांचे नव्याने नियोजन करणेचे सुचना केलेली आहे.

शहरातील ज्या रस्त्यांवरील वाहतूकीचे प्रमाण प्रती तासी 4000 वाहने पेक्षा जास्त आहे अशा 4 रस्त्यांवर मुख्यत: रस्त्यांची रुंदी वाढविणे, चौकांची सुधारणा व सिग्नलांचे सुसुत्रीकरण या बाबी करणेबाबत सुचित केल्या आहेत.

शहरातील एकुण 22 वाढीव चौकांसाठी सिग्नल व्यवस्था उभारणेबाबत व शहरातील वाहतूकीचे अत्याधुनिक Intelligent Transport System (ITS) या प्रणालीचा वापर करणेचे सुचविले आहे.

शहरातील पादचाऱ्यांसाठी आवश्यक पदपथ उभारणे कामी एकुण 93 कि.मी. लांबीच्या रस्ते सुचविले आहेत.

शहराच्या हवेच्या प्रदुषणात घट होणेकामी सायकलचा वापर जास्तीत जास्त होणे गरजेचे असल्याने सायकल स्वारांची संख्या वाढणेच्या दृष्टीकोणातून एकुण 54 कि.मी. लांबीच्या रस्त्यांवर सायकल ट्रॅक तयार करणेचे सुचविलेले आहे.

शहरातील अवजड वाहनांच्या माध्मातून होणाऱ्या माल वाहतूकीच्या वाहनांचे नियोजन होणे कामी शहराच्या मुख्य केंद्रीय रस्त्यांवर शहराच्या सिमेवर ट्रक टर्मिनस उभारण्याची सुचना केली आहे.शहरातील प्रमुख रस्त्यांवर होत असलेल्या वाहनांच्या पार्कींग व्यवस्थेचे नियोजन होणेकामी शहरातील प्रमुख रस्त्यावरील एकुण 34 ठिकाणी  व 6 खुल्या जागांवर “ पे ॲण्ड पार्क” व्यवस्था राबविणेचे सुचविलेले आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.