भोसला मिलिटरी स्कूल शाळकरी मुलांचे ३५ किमी रात्रीचे संचलन उत्साहात
नाशिक : रात्रीची वेळ…काळाकुट्ट अंधार..त्यात अनोळखी ठिकाणे….रस्ताही निर्जन…शहरापासून लांब जवळजवळ ३५ किमीचे अंतर शाळेतील मुलं उत्साहाने पार करतात ही जरा आगळीवेगळी गोष्ट. भोसला मिलिटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या सैनिकी प्रशिक्षणाचा भाग म्हणून ५ वी ते १२ मधील विद्यार्थी २० ते ३५ किमीचे अंतर एका रात्रीत न भिता सहजरित्या पार करून आले.
विद्यार्थ्यांनी अनुभवले ते रात्रीची नीरव शांतता, विविध आवाज
मनातील अंधाराची भीती काढून शांततेचा आणि आवाजाचा आनंद रात्र संचलनात लुटला. बरोबर कुठलाही फोन नाही. उजेड आवश्यकतेनुसार. रस्त्यावर रहदारीसुद्धा नाही. त्यात काही ठिकाणी रस्त्यावर सापही दिसले सावधगिरी बाळगत न घाबरत विद्यार्थी त्याच्या हालचालीकडे कुतूहलाने पाहत होते. काही वेळा रस्त्यावरून चालण्यापेक्षा थोडा आडवळणाचा, शेतातील रस्तासुद्धा विद्यार्थ्यांनी वापरला. हे सगळं करता करता अंधार, चंद्र आणि डोंगर ह्यांचे अनोखे दर्शन त्यांना भारावून टाकणारे होते. वेगवेगळ्या आवाजांच्या संगीताचा आनंद त्यांनी मनमुराद लुटला.
हे सगळं करताना आपोआप एकमेंकाना सहकार्य करण्याची वृत्ती दिसून येत होती. त्यामुळे त्यांच्यातील टीम बांधणी अतिशय छान झाली. आपापल्या ग्रुपला जरा कठीण वाटणाऱ्या परिस्थितीत सगळ्यांना बरोबर घेऊन जायचे होते, सांभाळायचे होते. त्यातून नेतृत्वगुणही पणाला लागत होते. चालता चालता छत्रपती शिवाजी महाराज कि जय अशा घोषणा देत, कदम कदम बढाये जा, कंधों से मिलते हैं कंधे कदमो से क़दम मिलते हैं हम चलते हैं जब ऐसे तो दिल दुश्मन के हिलते हैं ही गाणी ही मुलं गुणगुणत होती. या संपूर्ण प्रवासात कुणालाही भीती वाटली नाही. कारण विचारलं तर सगळे बरोबर असताना भीती कसली? या रात्रीच्या प्रवासात काही नागरिक भेटले, पोलीस कर्मचारी भेटले. त्याच्या चेहऱ्यावरील कौतुकाचे भाव आणि भोसलाविषयीचा अभिमान बरंच काही सांगून जाणारा होता.
नवीन आलेल्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत असा अनुभव कधीही घेतला नव्हता. ही एकत्रितपणाची, अंधारावर मात करण्याची भावना ही एकमेंकाबद्दल बांधिलकी जपायला सांगणारी आहे असं थोडी वयाने मोठी असलेली ११ वी आणि १२ वीतील मुलं सहजरित्या सांगून जातात. बरं हे सगळं करत असताना वेळेचे व्यवस्थापन करणे हेही आव्हान होते. शेवटची मुलं रात्री १०:२२ ला बाहेर पडली असं सांगत १० ला सुरु झालेलं हे संचलन बरोबर वेळेत ५ वाजता ३५ किमीचे अंतर संपून हे विद्यार्थी भोसला मिलिटरी स्कूलमध्ये आले. ५ वी ते ७ वीच्या मुलांसाठी अंतर कमी होते पण तेही वेळे पोहचले.
सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या भोसला मिलिटरी स्कुलच्या ६३७ विद्यार्थ्यांनी काल रात्री १०:३० पहाटे ५:३० या वेळेत ३० किमी अंतराचे संचलन सुरक्षितरित्या केले. पहिला टप्पा हा भोसला मिलिटरी स्कुल ते मुंगसरा ७ किमीचा होता. दुसरा टप्पा मुंगसरा ते मातोरी ३ किमी, तिसरा मातोरी ते मखमलाबाद ३ किमी, चौथा मखमलाबाद ते डोंगरे वसतिगृह ७ किमी व शेवटचा पाचवा डोंगरे वसतिगृह ते भोसला मिलिटरी स्कुल ३ किमी हे २० किमीचे अंतर ५ वी ते ७वीच्या ३१६ विद्यार्थ्यांनी पार केले. यात अशोक देवरे, एस के पाटील, बी झेड झांबरे, अनिल पाटील या सुभेदार आणि प्रवीण मातेरे या शिक्षक कर्मचाऱ्यांचा सहभाग होता .
दुसरया मार्गावर ८वी ते १२ वी ३२१ विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यांनी भोसला मिलिट्रय स्कुल ते मुंगसरा, दरी , मातोरी, मखमलाबाद, पेठ रोड, मार्केट यार्ड, डोंगरे वसतिगृह या मार्गाने ३० किमी चे अंतर पार केले. यात सुभेदार शांताराम गायकवाड, भारत अहिरे, दीपक चव्हाण, प्रवीण दालोद या सुभेदार शिक्षक कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. या साहसी उपक्रमाबद्दल भोसला मिलिटरी स्कुलचे अध्यक्ष अतुल पाटणकर, कमांडट निवृत्त मेजर चंद्रसेन कुलथे, मुख्याध्यापिका चेतना गौर यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांचे अभिनंदन केले.