ylliX - Online Advertising Network

निफाड तालुक्यात ६०० ते ७०० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान

कांदा ,द्राक्ष व भाजीपाला शेती उध्वस्त लाखोंचे नुकसान
आमदार अनिल कदम व प्रांत अधिकाऱ्यांनी केेली पाहणी
लासलगाव : तालुक्यात रविवार दि 30 रोजी झालेल्या गारपिटीत चितेगाव, चेहेडी, नारायणगाव, वऱ्हेदारणा, चांदोरी, लालपाडी, ओने, दात्याने, सुकेणे, ओझर, धानोरे, बाणगंगा नगर, दिक्षी या 13 गावांमध्ये द्राक्ष, कांदा व भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तालुका कृषी विभागाने केलेल्या प्राथमिक अहवालात या गावातील प्राथमिक अहवालानुसार ६०० ते ७०० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे.
यामध्ये अंतिम टप्प्यात असलेले द्राक्ष बागांचे खुडे सुरु होते त्यावर परिणाम झाला. या शिवाय खडकमाळेगाव, वनसगाव, शिवडी, उगाव, लासलगाव, सोनेवाडी या भागातही अवकाळी पावसाने द्राक्ष व कांदा पिकांचे नुकसान झाले आहे.
उगांव व परिसरात वादळी वार्यामुळे परिपक्व द्राक्षबागा कोसळुन लाखोंच्या द्राक्षमालाचे नुकसान झाले आहे. शिवडी येथील निवृत्ती क्षीरसागर यांचा तीन एकर, दिलीप शिंदे यांचा एक एकर, तर सोनेवाडी खुर्द येथील बाळासाहेब सानप यांचा चार एकर द्राक्षबाग वादळाने कोसळला आहे. तीनही द्राक्षबागा परिपक्व होत्या त्यांना आधारासाठीचे अँगलही वाऱ्याने वाकविले आहे. द्राक्षबागा कोसळल्याने द्राक्षघडांचे मोठे नुकसान झाले तर जमीनीवरही द्राक्षमण्यांचा सडा पडलेला होता. यामुळे द्राक्ष उत्पादकांचे लाखोंचे नुकसान झाले आहे कोसळलेल्या द्राक्षबागा उभ्या करण्यासाठी द्राक्ष उत्पादकांना मजुरांची शोधाशोध करावी लागत होती. या बरोबरच सर्वात जास्त नुकसान कांदा या पिकांचे झाले. कांदा काढणी सुरु असताना अचानक पाऊस सुरु झाल्याने काढलेला कांदा झाकताना शेतकऱ्यांना खूप कसरत करावी लागली. यात काही प्रमाणात कांदा भिजला. काही ठिकाणी कांदा चाळीत पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले तसेच चांदोरी, चेहडी, चितेगाव या भागात भाजीपाला पिकवणारे शेतकरी मोठया प्रमाणात आहे. त्यांच्या पिकांचे गारा व मुसळधार पाऊस याने नुकसान झाले. कोबी, फ्लॉवर, टोमॅटो आदी भाजीपाला पिकांचा यात समावेश आहे.

आमदार अनिल कदमांची अधिकाऱ्यांसमवेत पाहणी

अवकाळी पाऊसाने निफाड तालुक्यातील पश्चिम भागातील शेतकऱ्याला अक्षरक्षः उध्वस्त केले असून भाजीपाला पिकासह कांदा व डाळींब बागांचे अतोनात नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. गारपिटीचे स्वरुप एवढे भयानक होते की आधुनिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे पॉलिहाऊस व शेडनेटची वाताहत या वादळी पाऊस व गारांमुळे झाली आहे. आधी सुलतानी संकटामुळे खचलेला शेतकरी आता आसमानी संकटामुळे आयुष्यातून उठण्याच्या मार्गावर आहे. रविवारी संध्याकाळी चारपाच वाजता आलेल्या वादळी पाऊस व गारपिटीचा तडाख्यामुळे निफाड तालुक्यात असलेल्या पश्चिम भागातील चेहडी परिसरामध्ये शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. आधुनिक शेतीची कास धरीत उभारलेल्या पॉलिहाऊस व शेडनेटच्या गारा व वादळी पाऊसाने चिंधड्या उडाल्या.

शेतात काढून ठेवलेला कांदा असो वा कोबी फ्लॉवरसारखा भाजीपाला आणि निर्यातक्षम द्राक्षे डाळिंब पिक यांचे अतोनात नुकसान झाले. कोबी फ्लॉवरच्या पानांची चिरफाड होऊन ते उध्वस्त झाले तर डाळिंबांचे साल सोलली गेली व फळे तडकले गेले. द्राक्षांना आधीच दर कमी त्यात गारांमुळे द्राक्षे गळून फुटले गेले.
गारपिटीमुळे उध्वस्त झालेल्या शेतीची पाहणी शिवसेनेचे निफाडचे आमदार अनिल कदम यांनी प्रांताधिकारी महेश पाटील व तहसिलदार विनोद भामरे यांचेसमवेत केली. यावेळी गारपिटीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना त्यांनी धीर दिला पण उध्वस्त शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले होते. आमदारांनी त्यांच्या पातळीवर नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले असून खचलेल्या शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन देत त्यांनी शिवसेनेतची संपुर्ण कर्जमाफीची मागणीची पुर्तता लवकरात लवकर केली तरच शेतकऱ्याला सन्मानाने जगता येईल अशी आशा व्यक्त केली. कर्जाच्या डोंगरासह अस्मानी संकटामुळे शेतकरी खचला असून संपुर्ण कर्जमुक्त झाल्याशिवाय शेतकरी पुन्हा नव्या दमाने उभा राहील नाहीतर शेतकरी आधीच उध्वस्त झाला असून अशा आसमानी संकटामुळे तो पुर्णतः खचण्याची भिती आमदार कदम यांनी व्यक्त केली.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.