नाशिकमध्ये चेनस्नॅचिंग सारखे गुन्हे वाढतच असताना या चेनस्नॅचर लोकांना पकडण्यात नाशिक पोलिसांना अपयश येत होते. मध्यंतरी मोबाईल स्नॅचिंग करणाऱ्यांना पकडण्यात यश मिळाले. मात्र चेनस्नॅचिंग च्या घटनांच्या तुलनेत गुन्ह्यांची उकल होण्याचे प्रमाण बरेच कमी होते. मात्र गुरुवारी रात्री अमृतधाम परिसरात ५ तोळ्याची सोन्याची पोत चोरी करून पळून जात असताना एक चोर दुचाकीवरून पडला. अशावेळी नागरिकांनी त्वरित त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
पुढे पोलिसांनी अधिकच तपास केला असता चोराने दिलेल्या कबुली जबाबात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. चोर चोरी करताना पकडले जाऊ नये म्हणून नवनवीन शकला लढवत असताना चोरांच्याच टोळीतील एक इसम चोरी करण्यासाठी नवीन पल्सर चोरांना भाड्याने देत असल्याचा चक्रावून टाकणारा प्रकार समोर आला आहे. एकदा शोरूम मधून काढलेली नवीन गाडी लवकर पासिंग न करता ती बिना नंबरची गाडी चोरांना चोरी करण्यासाठी भाड्याने वापरायला देण्याची नामी शक्कल त्याने शोधून काढली होती. या बळावर या इसमाने तब्बल चार मजली इमारत उभी केली असून चोऱ्या करायला गाडी भाड्याने देत त्याने गजगंड संपत्ती गोळा केल्याचे दिसत आहे. यामध्ये पोलिसांनी किरण सोनावणे आणि विलास मिरजकर यांना अटक केली असून, न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे. या चोरट्यांना जे मदत करत होते त्यांची नावे पोलिसांना कळली असून पोलिसांनी कारवाई आधीच सुरु केली आहे.
पुढील तपास नाशिक पंचवटी पोलीस करत असून लवकरात अनेक गुन्हे यामुळे उघड होण्याची शक्यता आहे.