मराठवाड्याची जीवनवाहिनी असलेल्या जायकवाडी धरणाचे सलग चौथ्यावर्षी दरवाजे उघडण्यात आले आहेत. आज सायंकाळी सात वाजून २० मिनिटांना सुरुवातीला दोन दरवाजे उघडून गोदावरी पात्रात विसर्ग करण्यात येत आहे. टप्याटप्प्याने एकूण १८ दरवाने अर्धा फुटाने उघडून तब्बल ९ हजार ४३२ क्युसेक विसर्ग करण्यात येणार असल्याची माहिती आहे. nashik rain update

वरच्या भागात दमदार पाऊस झाल्याने पावसाळ्याच्या सुरुतीपासूनच जायकवाडी धरणात मोठ्या प्रमाणावर आवक सुरु आहे. सध्या ३६ हजार क्युसेक पाण्याची आवक धरणात सुरु आहे. तसेच आणखी जोरदार पावसाची शक्यता असल्याने आवक वाढत जाणारी आहे. दरम्यान, धरणाची पाणीपातळी आज दुपारी ९० टक्के झाली. तसेच पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस होत असून, त्यामुळे पाणलोट क्षेत्रातील नदी , नाल्यांद्वारे, जायकवाडी धरणात पाण्याची आवक वाढत असल्यामुळे धरणाची पाणी पातळी वाढत आहे. यामुळे आज सायंकाळी धरणातून विसर्ग करण्याचा जिल्हा प्रशासनाने निर्णय घेतला. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या उपस्थितीत आज सायं ७:१५ वाजता जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडण्यात आले. सुरुवातील दोन आणि टप्प्याटप्प्याने तब्बल १८ दरवाजे अर्धा फुटाने उघडून तब्बल ९ हजार ४३२ क्युसेक विसर्ग करण्यात येत आहे. पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढविण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. जुलै महिन्यात दरवाजे उघडून विसर्ग करण्यात आल्याची मागील १५ वर्षातील ही दुसरी वेळ आहे. गोदावरी नदी काठच्या दोन्ही तीरावरील नागरिकांना सतर्क राहणेबाबत प्रशासनाने सूचना दिल्या आहेत. तसेच नदीपात्रात कुणीही जाऊ नये, पाळीव प्राणी, गुरेढोरे, विद्युत मोटारी तसेच इतर साहित्य इत्यादी तात्काळ काढून घेण्याचे आवाहन जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
सलग चौथ्यावर्षी करण्यात आला विसर्ग
मागील तीन वर्षांपासून नियमितपणे जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडावे लागत आहेत. यंदा जुलै महिन्यातच जायकवाडीचे दरवाजे उघडावे लागण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. सन १९७६ साली जायकवाडी धरण बांधून पूर्ण झाले. साधारणत: १०५ टीएमसी पाणी साठविण्याची या धरणाची क्षमता आहे. धरणाला ४६ वर्षे झाल्यामुळे अनेक दुरुस्त्यांची कामे अद्याप झालेली नाहीत. ४६ वर्षांत सर्वाधिक वेळा दरवाजांचे ऑपरेशन होण्याचा योग २०१९ च्या पावसाळ्यात आला. धरण १०० टक्के भरल्यानंतर अंदाजे ५५ ते ६० टीएमसी पाण्याचा विसर्ग मागील तीन वर्षांत करण्यात आला.
मराठवाड्याच्या दृष्टीने महत्वाचे मानले जाणारे जायकवाडी धरण चौथ्या वर्षी ‘फुल्ल’ होण्याच्या दिशेने आहे. मेंढीगिरी समितीच्या शिफारशीनुसार जायकवाडीमध्ये ६५ टक्क्यांपेक्षा कमी साठा असल्यास नाशिक आणि नगर जिल्ह्यातील धरण समूहातून पाणी सोडावे लागते. यंदा मात्र ती परिस्थिती राहणार नाही. संततधार पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे जायकवाडीमधील जलसाठा शनिवारी (ता. १६) रात्री ६५ टक्क्यांच्यापुढे पोचला होता.
जायकवाडीमधील उपयुक्त साठा ६५ टक्क्यांपर्यंत पोचण्यासाठी ऑगस्ट-सप्टेंबरपर्यंतची प्रतीक्षा करावी लागत होती. नांदूरमधमेश्वर धरणातून आज सकाळपर्यंत २६.५८ टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात जायकवाडीमधील जलसाठा ३७ टक्क्यांपर्यंत होता. नांदूरमधमेश्वरहून सोडण्यात येत असलेल्या पाण्याचे प्रमाण पाहता, शनिवारपर्यंत (ता. १६) जायकवाडीमधील जलसाठा ६५ टक्क्यांपर्यंत पोचण्याचा अंदाज जलअभ्यासकांनी वर्तवला होता. nashik rain update