नाशिक : शहराच्या मध्यवर्ती भागात असलेला आणि नेहमी वर्दळ असणाऱ्या द्वारका चौकात सतत होणारी वाहतूक कोंडी आणि अपघातांच्या घडणाऱ्या घटना लक्षात घेऊन शहर पोलिसांनी द्वारका चौकातील भुयारी मार्ग पुन्हा वापरात येण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याचा निर्णय घेतला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या भुयारी मार्गातील तांत्रिक चुका आणि गर्दुलल्यांनी या मार्गाचा घेतलेला ताबा यामुळे पादचाऱ्यांनी या भुयारी मार्गाकडे पाठ फिरवली. परिणामी द्वारका चौकात वाहतूक कोंडी बरोबरच पादचाऱ्यांचीही गर्दी वाढू लागली. द्वारका चौकात नियमित होणारी वाहतूक कोंडी आणि वारंवार घडणाऱ्या अपघातांच्या घटना रोखण्यासाठी भुयारी मार्ग पूर्णतः वापरात येण्याच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली असल्याची माहिती पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिली.
द्वारका चौकातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी गेल्याच आठवड्यात मुंबईतील हाजीअलीच्या धर्तीवर वाहतूक बेट काढून त्याठिकाणी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्याचा पर्याय सुचवला होता. यानंतर पोलीस प्रशासनाने महामार्ग प्राधिकरण, महानगरपालिका यांना विश्वासात घेऊन भुयारी मार्गाचा चेहरा मोहरा बदलून हा मार्ग वापरात येण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकले आहे. पादचाऱ्यांनी आपल्या सुरक्षिततेचा विचार करून भुयारी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी केले आहे.
वाहतूक कोंडी, अपघात टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाचा पुढाकार द्वारका भुयारी मार्गाची दुरुस्ती देखभाल केल्यानंतर या भुयारी मार्गात सीसीटीव्ही कॅमेरे, पांढऱ्या रंगांचा प्रकाश देणारे एलईडी लाईट्स, दिशादर्शक फलक बसविण्यास याठिकाणी निर्भया पथक आणि बिट मार्शलची गस्त असणार आहे.
