छगन भुजबळ यांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दोन दिवस उरले असतांना जिल्ह्यातील आणि शहरातील राजकारणात मोठी उलाथापालथ केली असून माणिकराव कोकाटे, राहुल ढिकले यांना राष्ट्रवादीत आणण्यास यशस्वी झाले आहेत. हे दोघे स्वतः मोठी व्होट बँक सोबत असणारे नेते आहेत. तर लोकसभा निवडणुकीत सिन्नर येथून मोठ्या प्रमाणात माणिकराव कोकाटे यांनी मते मिळवली होती, त्यामुळे नक्कीच या दोघांचा फटका इतर उमेदवारांना पडणार आहे.
राष्ट्रवादी हा पक्ष मराठा कार्ड यावर आधारित असल्याने कोकाटे यांनी राष्ट्रवादीची साथ देण्याचे ठरवले. तर मनसेतून अनेक दिवस स्वतःला दूर ठेवणारे ढिकले यांनी सुद्धा राष्ट्रवादीची वाट धरली आहे. त्यांचे वडील उत्तमराव यांचे स्वतःची अशी व्होट बँक होती. राज ठाकरे यांच्या कारीश्म्यात आमदार होऊ असे राहुल यांना वाटले नसावे , त्यामुळे त्यांनी मनसेला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.
भुजबळ हे स्वतः शिवसेनेत जातील असे चित्र तयार केले गेले होते. मात्र असे झाले नाही, आणि शेवटी भुजबळ यांनी शहरातील राजकारणात मोठा धक्का दिला आहे. विद्यमान आमदार हे फक्त मुख्यमंत्री आणि नरेंद्र मोदी यांच्या करिष्म्यावर निवडणून आले आहेत असे अनेकांचे मत आहे. मात्र या दोघांच्या मागे त्यांचे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे त्यांच्या मतांचा राष्ट्रवादीला नक्कीच फायदा होणार आहे. त्यामुळे विद्यमान आमदारांना आता लढाई सोपी राहणार नाही हे उघड आहे. त्यामुळे आता फक्त करिष्मा नाही तर खऱ्या अर्थाने कार्यकर्ते उभे करावे लागणार आहेत. उद्या मुंबई येथे अजित पवार, छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत हे दोघे प्रवेश करणार आहेत.
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने पहिली उमेदवारी जाहीर केल्यानंतर अपेक्षेप्रमाणे नाराजांनी बंडाचे निशाण फडकावले आहे. यामध्ये नाशिकमध्ये भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
शिवसेना-भाजपमधील जागावाटपानुसार भाजपच्या वाट्याला १६४ जागा आल्या आहेत. भाजपकडून मंगळवारी १२५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. यानंतर राज्याच्या अनेक भागांमध्ये उमेदवारीची आस लावून बसलेले नेते नाराज झाले आहेत.
तर दुसरीकडे भाजप नेते वसंत गीते हे देखील पक्षावर नाराज असून ते लवकरच मोठा निर्णय घेतील अशी चर्चा शहरात जोरदार सुरु आहे. त्यामुळे असे बंड झाले तर भाजपा ते कसे थोपवणार या कडे सर्व पाहत असून , गीते यांनी पक्ष सोडला किंवा निवडणुकीत नाराजी व्यक्त केली तरी भाजपला मोठे नुकसान सहन करावे लागणार आहे. मात्र गीते यांच्या कडून अजून कोणतीही अधिकृत घोषणा झाली नसल्याने राजकारण तापले आहे.