नाशिक : नाशिकच्या आर्टिलरी सेंटरमध्ये बनावट कागदपत्रं सादर करुन 4 तरुणांनी थेट 15 दिवस प्रशिक्षण घेतल्याचं समोर आलं आहे. केवळ नाशिकच्या आर्टिलरीच नाही तर अहमदनगरच्या एमआयआरसी आणि नागपुरच्या गार्ड रेजिमेंट आणि इतर काही लष्करी संस्थातही अशाच पद्धतीने बनावट कागदपत्रं तयार करुन 40 तोतया प्रशिक्षणार्थींनी घुसखोरी केली असावी असे समोर येत आहे.. नाशिक पोलिसांनी लष्कर भरती करुन देणाऱ्या लष्करी जवानासह 2 एजंटांनाही अटक केली आहे. ही कारवाई दिल्ली येथे करण्यात आली आहे.
बनावट कागदपत्रे तयार करून नाशिकच्या आर्टिलरी सेंटरमध्ये असे 4, अहमदनगरच्या एमआयआरसीमध्येही 3 आणि नागपुरच्या गार्ड रेजीमेंटमध्येही अशाच पद्धतीने घुसखोरी केलेल्या तोतया प्रशिक्षणार्थी जवानांना अटक करण्यात आली आहे. नाशिक पोलिसांनी पैसे घेऊन लष्करात भरती करुन देणाऱ्या दिल्लीतील 2 एजंटांसह आर्मी हेडक्वार्टरमधल्या जवानालाही अटक केली आहे.त्यामुळे या प्रकरणाची गंभीरता वाढली आहे.
या मध्ये प्रामुख्याने भरतीसाठी उमेदवाराकडून 4 ते 10 लाख रुपये घेण्यात येत होते . यामध्ये हरियाणातील बनावट रिक्रूटमेंट सेंटरचं पत्र घेऊन दिल्ली मुख्यालयाकडे भरतीची प्रक्रिया सरकवली जायची. दिल्लीतून मिळणारं राहदरी आणि मेडीकल सर्टिफिकेट जसच्या तसं छापून दिलं जायचं. हे प्रमाणपत्र इतके हुबहुब असायचे की कुठलाही संशय न येता या तोतया प्रशिक्षणार्थींचा थेट प्रवेश व्हायचा.
जुलै महिन्यात 4 तरुणांनी बनावट संशयास्पदरित्या घुसखोरी केल्याचं नाशिक आर्टिलरीच्या लक्षात आल्यावर हे प्रकरण समोर आले आहे . पाठपुरावा करुन नाशिक पोलिसांनी दिल्लीतल्या लष्कराच्या हेडक्वार्टरमध्ये काम करणाऱ्या जवानासह दोन एजंटांना ताब्यात घेतलं आहे.आणि या रॅकेटचा पर्दाफाश केला. न्यायालयाने परवानगी दिल्याने लष्करातील हा तपास पोलिसांना करता आला आहे.
नाशिक आर्टिलरीमध्ये अटक करण्यात आलेल्या बलवीर गुज्जर, सचिन किशनसिंग, तेजपाल चोपडा, सुरेश महांतो या या 4 युवकांना अटक करण्यात आली आहे. ते सध्या नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात आहेत. तर नगरच्या एमआयआरसीतील 3 घुसखोर जवानही जेलमध्ये आहेत. दिल्लीतून लष्करी जवान गिरीराज घनश्याम चौहान सिंहसह एजंट टेकचंद मेघवाल आणि मदन मानसिंह पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणामुळे देशातल्या लष्करी आस्थापनांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे.