कुणी शिक्षक देता का शिक्षक? आश्रम शाळेतील विद्यार्थी बेदखल

रायते (ता. त्र्यंबकेश्वर) आश्रम शाळेचा एक्सक्ल्युसिव्ह रिपोर्ट राहुल बोरसे यांच्याकडून…

रायते आश्रम शाळेला  दीड वर्षांपासून गणिताचा शिक्षक नाही

राहुल बोरसे : हरसूल (नाशिक) : आदिवासी  विकास विभागातर्फे रायते (ता. त्र्यंबकेश्वर) येथे पहिली ते दहावीपर्यंत आश्रम शाळा सुरु आहे. या शाळेत गेल्या दीड वर्षापसून गणिताचा शिक्षकच नसल्याने तोंडावर आलेल्या दहावीच्या परीक्षांचा अभ्यासक्रम शिकवलाच गेला नाही. बोर्डाच्या परीक्षेत काय होईल? याची चिंता विद्यार्थ्यांना सतावत आहे.

या आश्रम शाळेसाठी ३१ कर्मचाऱ्यांची पदेही मंजूर आहेत. परंतु मागील अनेक वर्षांपासून पदभरती न झाल्याने विविध  १५ पदे रिक्त आहेत. त्यातला त्यात मागील वर्षांपासून गणित विषयाचा कायमस्वरूपी शिक्षक नाही. सहा महिने उलटून गेले आहेत तरी देखील दहावीच्या वर्गात गणिताचा अभ्यासक्रम एकही तासिकेत शिकवला गेलेला नाही. मागील वर्षी अशीच स्थिती असताना शिक्षक आयात करून वेळ मारून नेण्यात आली होती. तरीही निकाल बऱ्यापैकी लावला होता. मात्र मागील अनुभवातून काहीही न केल्याने या वर्षात या आदिवासी विद्यार्थ्यांचे भवितव्य काय असणार? विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान कधी थांबणार याकडे संबंधितांचे लक्ष लागले आहे.

निधी उपलब्ध होऊनही इमारत अडकली ‘पायात’

२०१३-२०१४ या वर्षात शाळेला इमारत बांधण्यासाठी सुमारे १८ कोटी रुपये निधी मंजूर झाला. मात्र इमारत अजून उंची घेतांना दिसत नाहीत. दोन वर्षांपासून इमारतीचे काम ‘पायातच’ अडकले आहे. शैक्षणिक सुविधा उपलब्ध नसताना भौतिक सुविधांवरही दुर्लक्ष केले जात आहे. बैलगाडीत पाणी वाहण्याची व्यवस्था आहे. मात्र गेल्या एक वर्षांपासून पाणी वाहतुकीचे बिल न मिळाल्याने ते देखील बंद होण्याच्या मार्गावर आहे. आश्रम शाळेची पाणी पुरवठा योजनाही २०१२ पासून अपूर्णच आहे. विद्यार्थ्यांना आंघोळीसाठी नदीचा आधार घ्यावा लागतो. ३६१ ( २०५ मुलं + १५५ मुली ) एवढा मोठा पट असूनही विध्यार्थ्यांना वह्या, तेल, साबण अनेक महिन्यांपासून मिळालेले नाहीत. तर जुन्या वह्यांवर शिक्षक काम भागवत असून गेल्या चार महिन्यापासून विद्यार्थ्यांना गृहपाठ देणेही जिकिरीचे बनले आहे. वसतिगृहाला अधीक्षिका नसल्याने विध्यार्थींनिची सुरक्षा राम  भरोसे आहे.

प्रत्यक्ष भेट दिल्यानंतर दिसते सुविधांची वानवा…

रायते आश्रम शाळेत प्रत्यक्ष भेट दिल्यावर असंख्य समस्या, विद्यार्थ्यांची शैक्षणिक सुविधांचा अभाव, भौतिक सुविधांची वानवा, विद्यार्थी-विद्यार्थिनींची सुरक्षा, चार महिन्यांवर परीक्षा असताना अवघड विषयाचा शिक्षक नाही हे सर्व  पाहिल्यावर आदिवासी शिक्षणावर होणारा करोड़ोंचा खर्च जातो कुठे असा प्रश्न पडतो. तर आदिवासी नेते, पुढारी यांना या समस्या दिसत नाहीत की याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जाते आहे असा प्रश्न निर्माण होतो. या सर्व परिस्थितीत या विद्यार्थ्यांना कुणी शिक्षक देता का शिक्षक ? असे म्हणण्याची वेळ आली आहे. चार महिन्यांसाठी का होईना दहावीच्या विद्यार्थ्यांना गणित शिक्षक मिळावा अशी अपेक्षा विद्यार्थी बाळगून आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी किती नेते मंडळी पुढे सरसावतात व काय पाठपुरावा करतात ? याकडे  विद्यार्थी -पालकांचे लक्ष लागले आहे .

राहुल बोरसे, पत्रकार, हरसूल
rahulborse061@gmail.com

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.