ylliX - Online Advertising Network

मविप्र मॅरेथॉन : हरियाणाचा करणसिंग ठरला विजेता तर किशोर गव्हाणे उपविजेता

५ वी राष्ट्रीय नाशिक मविप्र मॅरेथॉन स्पर्धा हरियाणाचा करणसिंग ठरला विजेता तर किशोर गव्हाणे उपविजेता

नाशिक : नाशिकमधील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेकडून आयोजित ५ वी राष्ट्रीय आणि १० वी राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेत हरियाणाचा करणसिंग विजेता ठरला आहे. महाराष्ट्राचा धावपटू किशोर गव्हाणे याने दुसरा क्रमांक पटकावला. तर पुण्याचा अभिमन्यू कुमार तिसऱ्या क्रमांकावर राहिला. तब्बल पाच हजारांहून अधिक धावपटूंनी स्पर्धेत सहभाग नोंदवला. यावेळी नौकानयनातील ऑलिम्पिकपटू दत्तू भोकनळ हे  स्पर्धेचे प्रमुख आकर्षण ठरले.

नाशिकच्या कडाक्याच्या थंडीत गंगापूर रोडवरील मॅरेथॉन चौक येथून सकाळी साडे सहावाजेपासून मॅरेथॉन स्पर्धेला सुरवात झाली. पूर्ण आणि अर्ध मॅरेथॉनसह विविध १७ गटांत ही स्पर्धा झाली. यासाठी वेगवेगळ्या गटात विजेत्या खेळाडुंना एकुण ७ लाख  २३ हजार इतक्या रकमेची रोख पारितोषिके देण्यात आली. तसेच मविप्र उत्कृष्ट खेळाडू पुरस्कार देखील प्रदान करण्यात आले.

 

खडतर परिस्थितीत स्वतःला खंबीर ठेऊन निश्चित केलेल्या धेय्याचा पाठलाग करा,त्यासाठी योग्य दिशा ठरवून नियमित सराव व आत्मविश्वासाने यश संपादन करा असे मार्गदर्शन भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केलेले खेळाडू दत्तू भोकनळ यांनी केले.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनात एकुण १५०० पेक्षा जास्त स्वयंसेवक कार्यरत असल्याची माहिती निलिमाताई पवार यांनी दिली. मॅरेथॉन स्पर्धा अधिक तांत्रिक व शास्रशुद्ध पद्धतीने होत आहे व  नावाजलेल्या खेळाडूंचा सहभाग दिवसेंदिवस वाढत आहे ही संस्थेसाठी भूषणाव बाब असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

महापौर रंजना मानसी यांनी मविप्र मॅरेथॉन हा नाशिक शहराच्या नावलौकिकात भर टाकणारा दर्जेदार उपक्रम असून त्या स्पर्धेसाठी महानगर पालिकेच्या माध्यमातून सर्वतोपरी मदत केली जाईल असे सांगितले. यावेळी राष्ट्रीय क्रीडादिनानिमित्त आयोजित क्रीडापटू रक्तदान शिबिरातील सर्वोच्च सहभागाबद्दलचे प्रथम पारितोषिक सिन्नर महाविद्यालय, व्दितीय पारितोषिक डॉ वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय आडगाव व तृतीय पारितोषिक दिंडोरी महाविद्यालयास प्रदान करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर नाशिकच्या महापौर रंजना मानसी, पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, संस्थेच्या सरचिटणीस व मविप्र मॅरेथॉनच्या संयोजन समिती अध्यक्षा श्रीमती नीलिमाताई पवार, संस्थेचे अध्यक्ष डॉ तुषार शेवाळे, संचालक डॉ विश्राम निकम,महिंद्रा कंपनीचे अधिकारी कर्नल सी एन बॅनर्जी ,शिक्षणाधिकारी, क्रीडाधिकारी प्रा. हेमंत पाटील, क्रीडाशिक्षक उपस्थित होते.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.