इगतपुरी तालुक्यातील घोटी खुर्द येथे शुक्रवारी रात्री दीडच्या सुमारास बाप आणि लेकाचा अज्ञात व्यक्तींनी निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे. काशीराम वामन फोकणे (वय ६५) आणि ज्ञानेश्वर काशीराम फोकणे (वय ४८) असे निर्घृण खून झालेल्या व्यक्तीची नावे आहेत. ज्ञानेश्वर फोकणे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा पदाधिकारी आहेत. (Murder)
या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, इगतपुरी तालुक्यातील घोटी खुर्द या छोट्या गावी ज्ञानेश्वर काशीराम फोकणे हे पत्नी आणि ३ मुलांसह राहत होते. मळ्यात त्यांची शेती असून वडील काशीराम वामन फोकणे हे एकटे मळ्यात राहायचे. ज्ञानेश्वर फोकणे यांनी एसएमबीटी परिसरात हॉटेल व्यवसाय सुरू केला असून त्यांचा संपूर्ण परिवार तेथेच वास्तव्यास आहे.
दररोज वडिलांना जेवण घेऊन घरातील लोक मळ्यात येत असे. शुक्रवारी रात्री १० च्या सुमारास ज्ञानेश्वर फोकणे वडिलांना जेवणाचा डबा घेऊन आले. मात्र, रात्री दीडच्या सुमारास त्यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी मळ्यात हल्ला करून खून केला. यावेळी त्यांचे वडील काशीराम फोकणे यांचाही निर्घृण खून झाला. सकाळी ही घटना उघडकीस आली. वाडीवऱ्हे पोलिसां अधिक तपास करत आहेत.(Murder)