ylliX - Online Advertising Network

मुंबईच्या मरीन ड्राइव्हला समुद्र किनारी एवढे सगळे काँक्रीटची ठोस ठोकळे का ठेवले आहेत? त्यामागचे विज्ञान काय आहे?

मरीन ड्राईव्ह प्रमाणेच बहुतेक समुद्र किनारी आपण जे कॉंक्रिटचे ठोकळे पाहतो त्याचा उद्देश हा मुख्यत्वेकरून समुद्रकिनाऱ्यांची धूप कमी करणे आणि समुद्र तटांची रक्षा करणे यासाठी केला जातो.

समुद्राच्या लाटांमध्ये प्रचंड शक्ती असते. या लाटा जेव्हा समुद्रकिनाऱ्यांवर येऊन आपटतात तेव्हा प्रचंड शक्तीचं हस्तांतरण होतं. या प्रचंड शक्तिशाली माऱ्यामुळे समुद्रतटांची झीज होते. काही ठिकाणी समुद्रतटालगत मानवनिर्मित बांधकामे केलेली असतात. उदा. मरिन ड्राईव्ह चा तट अथवा बुर्ज-अल-अरब जुमेराह सारखं मानवनिर्मित बेटावर बांधलेलं पंचतारांकित हॉटेल.

टेट्रापॉड्स:

समुद्राच्या शक्तिशाली लाटांच्या सततच्या माऱ्यामुळे अशा बांधकामांना हानी पोहोचण्याचा धोका संभवतो. अशामुळे ही बांधकामे लवकर कमकुवत होऊन त्यांचे आयुष्यमान कमी होते. अशा वेळी लाटांच्या माऱ्याचा प्रभाव कमी करण्यासाठी काँक्रीटच्या विविध आकारातील ठोकळ्यांचा उपयोग केला जातो.

यांच्या टेट्राहेड्रल (चार पायाचा) आकारामुळे यांना हे नाव पडले. टेट्रापॉड्स १९५० मध्ये फ्रान्समध्ये विकसित करण्यात आले आणि त्यांच्या प्रभावी उपयोगीतेमुळे ते जगभर प्रसिद्ध झाले. जपानचा जवळपास पन्नास टक्के समुद्रतट टेट्रापॉड्स वापरून संरक्षित करण्यात आला आहे.

टेट्रापॉड्स च्या विशिष्ट आकारामुळे ते एकमेकांत घट्ट बसतात. ते अशा प्रकारे डिझाईन केलेले असतात की जेव्हा लाटांचा मारा त्यांच्यावर पडतो तेव्हा ते पाण्याला चहूबाजूला पसरवतात. त्यामुळे लाटांच्या शक्तीचा बऱ्याच अंशी नाश होतो. वजन आणि विशिष्ट आकार यामुळे अत्यंत तीव्र हवामानातही ते आपल्या जागी स्थिर राहतात.

छिद्रित कॉंक्रिट ब्लॉक:

छिद्रित कॉंक्रिट ब्लॉक:

अशा प्रकारच्या ठोकळ्यांचा उपयोग सर्वप्रथम बुर्ज-अल-अरब जुमेराह या दुबई मधल्या पंचतारांकित हॉटेलच्या निर्मितीमध्ये करण्यात आला. हे हॉटेल समुद्रकिनाऱ्यापासून थोडंसं आत एका मानवनिर्मित बेटावर स्थित आहे. अशा वेळी लाटांच्या माऱ्याने बेटाची धूप होऊन हॉटेलला धोका निर्माण होऊ नये म्हणून यांचा वापर केला गेला.

यामध्ये एकावर एक रचलेले हे छिद्रित ठोकळे एखाद्या विशालकाय स्पंजप्रमाणे काम करतात. जेव्हा समुद्राच्या शक्तिशाली लाटा येऊन किनाऱ्यावर आपटतात तेव्हा लाटांचं पाणी ठोकळ्यांमधील छिद्रातून आत शिरतं. ठोकळ्याच्या विशिष्ट संरचनेमुळे आत शिरलेलं पाणी गोलाकार दिशेने फिरतं आणि त्याचा वेग मंदावतो. अशा प्रकारे लाटांची शक्ती प्रचंड प्रमाणात कमी होते व संभाव्य नुकसान टळते.

याखेरीज अन्य काही आकाराच्या ठोकळ्यांचा वापर काही ठिकाणी केला जात असला तरी त्यांचा उद्देश हा एकाच आहे तो म्हणजे लाटांच्या माऱ्यापासून किनाऱ्याचे आणि किनाऱ्यालगतच्या बांधकामांचे रक्षण करणे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.