ylliX - Online Advertising Network

पर्यटनाचे मार्केटिंग आणि ब्रँडीग करणे आवश्यक-महेश झगडे

जिल्ह्यातील पर्यटन वैशिष्ट्यांचे अधिकाधिक मार्केटिंग आणि ब्रँडीग करणे आवश्यक आहे. तिन्ही ऋतूत जिल्ह्यात आढळणारी वैशिष्ट्ये प्रभाविपणे जगासमोर नेण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने प्रयत्न करावे, असे प्रतिपादन  विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी सांगितले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार 5 ते 25 ऑक्टोबर या कालावधीत आयोजित करण्यात येणाऱ्या ‘पर्यटन पर्व’ उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., एमटीडीसीचे प्रादेशिक व्यवस्थापक नितीन मुंडावरे, सहाय्यक वनसंरक्षक सुजीत निवसे, वाईन समितीचे अध्यक्ष जगदीश होळकर, ‘तान’चे अध्यक्ष दत्ता भालेराव आदी उपस्थित होते.

 झगडे म्हणाले, इतर क्षेत्रातील रोजगाराच्या संधी वाढण्यासाठी मर्यादा असताना पर्यटन क्षेत्रातील संधी वाढत आहेत. या क्षेत्रात आपण मागे राहू नये यासाठी आपल्याकडील पर्यटनाचे मार्केटींग विदेशातील पर्यटन कार्यशाळा आणि चर्चासत्रांच्या माध्यमातून करण्यात यावे. तसेच विशिष्ट पर्यटनस्थळांचे नियोजनबद्ध ब्रँडींग करण्यात यावे. पर्यटन क्षेत्रासाठी कमी गुंतवणूकीत अधिक उत्पन्नाची संधी असल्याने या क्षेत्राच्या विकासाकडे जिल्हास्तरावरदेखील अधिक लक्ष देण्यात यावे.

पर्यटन क्षेत्राच्या ठिकाणी मुलभूत सुविधा देण्यासाठी नियोजन करण्यात यावे. देशाबाहेरील पर्यटकांना आकर्षित करण्याबरोबरच देशांतर्गत पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विभागातील स्थान वैशिष्ट्यांचा उपयोग करावा. आदिवासी भागातील कलांना जागतिक स्तरावर नेल्यास या भागातील पर्यटन वाढून ग्रामीण जनतेलादेखील रोजगार उपलब्ध होईल, असे त्यांनी सांगितले.

राधाकृष्णन म्हणाले, जिल्ह्यातील वातावरण, मुंबईची समिपता, पारंपरिक कला आणि ऐतिहासिक स्थळांमुळे नाशिकच्या पर्यटन विकासाला चांगली संधी आहे. पर्यटकांना अधिकधीक काळासाठी आकर्षित करण्यासाठी पर्यटन सर्कीट निर्माण करणे गरजेचे आहे. सामान्य पर्यटकांनादेखील पर्यटन करणे सुलभ होईल यादृष्टीने विचार करण्यात यावा, असे त्यांनी सांगितले. जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात ‘टूर डे सायकलिंग’ उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

मुंडावरे यांनी या उपक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. स्थानिक फूड फेस्टीवल, प्रवास वर्णनावर आधारीत निबंध स्पर्धा, अनाथ विद्यार्थ्यांची पर्यटन सहल, वारली ‍चित्रकला कार्यशाळा, स्थानिक कलांना प्रोत्साहन देणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

निवसे यांनी वन विभागातर्फे पर्यटनाला चालना देण्यासाठी हतगड, धोडप, ममदापूर येथे करण्यात येत असलेल्या सुविधांची माहिती दिली. श्री.होळकर यांनी वाईन टुरिझमच्या माध्यमातून इतर प्रकारच्या पर्यटनाला चालना देणे शक्य असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाला पर्यटन क्षेत्रातील विविध संस्थांचे प्रतिनिधी तसेच पर्यटन अभ्यासक्रमाचे विद्यार्थी उपस्थित होते.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.