मल्लखांब सारख्या खेळाला जास्त महत्व दिले पाहिजे – रवी नाईक ( जिल्हा क्रीडा अधिकारी, नाशिक)
नाशिक : यशवंत व्यायाम शाळेत १५ जून हा दिवस जागतिक मल्लखांब दिवस म्हणून साजरा करण्यात आला.
यंदा प्रथमच साजरा करण्यात आलेल्या या मल्लखांब दिनाच्या निमित्ताने मल्लखांब या अत्यंत अनिवार्य अशा खेळाचे महत्व समाजाच्या सर्व घटकापर्यंत पोहोचवावे हा हेतू आहे.
महाराष्ट्र हौशी मल्लखांब संघटनेने पुढाकार घेऊन १५ जून हा दिवस निवडून हा दिवस संपूर्ण भारतभर आणि अन्य देशातही साजरा करण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. या कार्यासाठी भारतीय मल्लखांब संघटना आणि देशातील आणि भारताबाहेरील संस्थांनीही चांगला प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे भारतामध्ये ज्या ज्या ठिकाणी मल्लखांब हा खेळ शिकवलं जातो अश्या ठिकाणी दिवसभर मल्लखांबविषयी कार्यक्रमाचे आयोजन करून या खेळाचे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन महाराष्ट्र मल्लखांब संघटना आणि भारतीय मल्लखांब संघटना यांच्या वतीने करण्यात आले होते.

या निमित्तानेच नाशिकच्या १०० वर्ष पूर्ण झालेल्या श्री यशवंत व्यायाम शाळेमध्ये १५ जून रोजी दिवसभर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. श्री यशवंत व्यायाम शाळेमध्ये मल्लखांब फार पूर्वीपासून शिकवला जातो. आजच्या या दिवसानिमित्ताने यशवंत व्यायाम शाळेत असलेल्या दोन मल्लखांबावर आणि मुलीसाठी असलेल्या दोरीच्या मल्लखांबावर प्रात्यक्षिक सादर करण्यात आली. यामध्ये नाशिकमधील नवीन आणि जुन्या मल्लखांबपटुनी मल्लखांब करून हा दिवस साजरा केला.

या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नाशिकचे जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, नाशिक महापालिकेचे माजी उपमहापौर गुरमीत बग्गा, ज्येष्ठ संघटक आबासाहेब घाडगे, यशवंत व्यायामशाळेचे उपाध्यक्ष रघुनाथ महाबळ, छत्रपती पुरस्कार प्राप्त अशोक दुधारे आणि आनंद खरे, सत्यप्रीत शुक्ला (त्रंबक व्यायाम शाळा), गिरीश लोया, किरण कवीश्वर आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी बोलतांना जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक म्हणाले की, हा दिवस सर्वांसाठी फार महत्वाचा आहे, आणि सर्वांनी मल्लखांबाचे महत्व ओळखले पाहिजे. मल्लखांब साठीच्या अश्या उपक्रमासाठी यशवंत व्यायाम शाळा आणि इतर सर्व संस्थांनी आणि मंडळांनी एकत्रित प्रयत्न करून या खेळाचा लाभ सर्वांना करून द्यावा, त्यासाठी शासनाची मदत आणि सहकार्य पूर्णपणे मिळेल असे सांगितले.
या उपक्रमात वय वर्षे चार वर्षांपासून ते ८० वर्षापर्यंतच्या सर्व आजी माजी मल्लखांब खेळाडूंनी सहभाग घेऊन मल्लखांब करून हा दिवस साजरा केला. यामध्ये यशवंत व्यायामशाळेचे माजी खेळाडू उल्हास कुलकर्णी, रमेश वझे, किरण कवीश्वर, गिरीश जाधव, दत्ता शिरसाट, प्रकाश कासार, प्रमिला जाधव, तेजस्वीनी जोशी श्रद्धा भालेराव, पूर्व शेळके, राष्ट्रीय सुवर्णपदक विजेती उत्तर खानापुरे, राष्ट्रीय खेळाडू सुवर्णा म्हात्रे, महक खैरनार, तनया गायधनी, चंचल माळी, अदिती गर्गे. अक्षय खानापुरे, ऋषिकेश ठाकूर, भाविक माकवाना आणि अश्या अनेक खेळाडूनी या उपक्रमत सहभाग घेतला.



या उपक्रमासाठी खास कोठूर गावाहून २० खेळाडू आणि त्याचे प्रशिक्षक यांनी यशवंत व्यायाम शाळेत येऊन प्रात्यक्षिके करून या उपक्रमात सहभाग घेतला. हा कार्यक्रम यश्स्वी करण्यासाठी यशवंत व्यायामशाळेचे प्रशिक्षक यशवंत जाधव,संदीप शिंदे, राज काळे, अक्षय खानापुरे, गिरीश जाधव, प्रमिला जाधव आणि यशवंत व्यायाम शाळेच्या सर्व खेळाडूंनी विशेष परिश्रम घेतले. असा उपक्रम महाराष्ट्रभर आणि देशात विविध ठिकाणी मोठया उत्साहात साजरा साजरा करण्यात आला.