महिला आयोगामार्फत पीडित महिलांना त्वरीत न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न
-विजया रहाटकर
नाशिक :-समाजातील अन्यायग्रस्त पीडित महिलांना त्वरीत न्याय मिळवून देण्याचा महिला आयोगाचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी केले.
आय.एम.ए.सभागृह येथे राज्य महिला आयोगाच्यावतीने आयोजित महिला कार्यशाळेत त्या बोलत होत्या. यावेळी महिला आयोगाचे सदस्य सचिव अ.ना.त्रिपाठी, जिल्हा पोलिस अधिक्षक अकुंश शिंदे, महिला आयोगाच्या सदस्या देवयानी ठाकरे, गयाताई कराड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी देवेंद्र राऊत, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या स्त्री अभ्यास केंद्राच्या प्रमुख शोभा शिंदे उपस्थित होते.
श्रीमती रहाटकर म्हणाल्या,महिला आयोगाचे कार्यालय मुंबईत असल्याने तालुका, गाव, वस्ती, तांड्यात राहणाऱ्या महिलांना आपल्या समस्या मांडण्यासाठी मुंबईला जावे लागते. त्यामुळे महिलांच्या समस्या जाणून घेत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ‘महिला आयोग तुमच्या दारी’ या कार्यशाळेचे आयोजन प्रत्येक विभागात करण्यात येत आहे. अन्यायग्रस्त पीडित महिलांसाठी महिला आयोग आधार असून त्यामुळे महिलांचा आत्मविश्वास वाढणार आहे. मात्र त्याचबरोबर राजकीय ,सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक महिलेला महिला विषयक कायद्याची माहिती असणे आवश्यक आहे. महिला हक्क आयोगामुळे प्रत्येक महिलेला प्रतिष्ठा व समानता मिळण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी यावेळी नमुद केले.
महिला आयोगाचे काम अधिक प्रभावीपणे होण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला महिला वकील, महिला मार्गदर्शक, महिला स्त्री-रोगतज्ज्ञ व महिला मानोपसचार तज्ज्ञ अशा चार जणांचे पॅनलची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे यावेळी श्रीमती रहाटकर यांनी सांगितले. 30 ऑगस्ट रोजी विभागीय आयुक्त कार्यालय येथे होणाऱ्या जनसुनावणीचेवेळी पीडित महिलांच्या समस्यांचा तात्काळ निपटारा होणार असल्याने जास्तीत जास्त पीडित महिलांनी जनसुनावणीस उपस्थित रहावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
महिला आयोगामार्फत महिलांचे रक्षण, सन्मान, समानतेचा अधिकार मिळवून देण्याचे काम केले जाते, असे श्री.त्रिपाठी यांनी सांगितले.
लग्नाआधी समुपदेशन कार्यक्रम जर राबविले गेले तर कौटुंबिक हिंसाचार कमी होण्यास मदत होईल, असे मत जिल्हा पोलिस अधिक्षक अंकुश शिंदे यांनी व्यक्त केले.
श्रीमती शिंदे यांनी सत्रात ‘लिंग समभाव व संवेदनशीलता’ या विषयावर मार्गदर्शन करतांना स्त्री-पुरुष समानतेने समाजातील अनेक प्रश्न सुटू शकतील. त्यासाठी पुरुषांनी स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलणे गरजेचे आहे, असे सांगितले.
समाजाने महिलांकडे बघण्याची मानसिकता बदलल्यास कायद्याच्या वापराशिवाय समस्या सुटू शकतील, असे ॲड.मिलन कोहर यांनी सांगितले.
कार्यशाळेस संरक्षण अधिकारी, सामाजिक कार्यकर्त्यां, विविध समितींच्या प्रतिनिधी उपस्थित होते.
पत्ता आणि फोन नंबर द्या प्लीज