आठव्या किर्लोस्कर वसुंधरा अंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे मनपाच्या कामटवाडेतील मटाले विद्यालयात उद्घाटन
नाशिक : सर्व नागरिकांना खासकरून युवक व मुलांना पर्यावरण समस्यांप्रती संवेदनशील बनविण्याचे प्रयत्न करण्यासाठी भरविण्यात येणाऱ्या “किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे’ कामटवाडे परिसरातील नाशिक महानगर पालिकेच्या मटाले विद्यालयात उद्घाटन करण्यात आले. नाशिक शहरात दि. २१ ते २४ ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या वसुंधरा महोत्सवाच्या या उद्घाटन समारंभाचे वैशिष्ट्य म्हणजे या विद्यालयातील विद्यार्थ्यांच्याच हस्ते दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले आहे.
किर्लोस्कर आणि वसुंधरा क्लबच्या पुढाकाराने देशातील २० हून अधिक शहरांमध्ये भरणारा हा महोत्सव नाशिकमध्ये सलग आठव्या वर्षी होत असून या वर्षीच्या महोत्सवाचा विषय ‘नदी वाचवा, जीवन वाचवा’ असा असणार आहे.महोत्सवाचे मार्गदर्शक वीरेंद्र चित्राव यांनी महोत्सवाची संकल्पना सांगताना ‘नद्यांची आजची अवस्था कशी भीषण आहे याची माहिती मटाले विद्यालयातील नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना दिली. दक्षिणेची गंगा गोदावरी नदीसाठी काय उपाययोजना करता येतील या संदर्भात चित्राव यांनी मुलांना प्रश्न विचारले. यावेळी मुलांनी प्लास्टिकचा वापर कमी करून सांडपाण्यावर प्रक्रिया करून थेट शहराबाहेर सोडण्यासारखे उपाय सांगितले.
नदी किनारी वसलेल्या लोकवस्तीतूनच विविध संस्कृत्या उदयास आल्या असून छोट्या नद्या आज कोरड्या पडल्या आहेत. गोदावरी सारखी नदीही आज वाहती राहिलेली नाही. या नद्या वाचविण्यासंदर्भात सर्व पातळ्यांवर जनजागृती करण्यासाठी वसुंधरा महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. पर्यावरण संबंधीची जागृकता तरुणांमध्ये निर्माण व्हावी म्हणून मनपाच्या कामटवाडेतील मटाले विद्यालयाची निवड केल्याचे सांगितले.
मटाले विद्यालयातील विद्यार्थ्यांना महोत्सवातील काही लघुपट दाखविण्यात आले. त्याचप्रमाणे दिवसभरात विविध वेळात रायगड चौक सिडकोतील मनपाचे विद्यालय, आर. पी. विद्यालय या मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये हे लघुपट विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले. यात ३० नोव्हेंबर २०१५ रोजी पॅरीस इथे झालेल्या युनोच्या पर्यावरणीय परिषदेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष फ्रान्सिस होलांद यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या ‘नॅशनल अँन्थम’ हा भारतीय राष्ट्रगीताच्या पार्श्वभूमीवर भारतीय भूमीतील वन्यजीवन चित्रित करण्यात आलेल्या लघुपटाचे स्क्रीनिंग करण्यात आहे. तसेच ‘नदी वाचवा, जीवन वाचवा’ या विषयावर आधारित गप्पीज जर्नी, टुगेदर पॉसिबल, प्लास्टिक प्लानेट, ग्रीन आर्मर, द डाइंग प्लानेट, गणपती बाप्पा मोरया, एव्हरी ड्रॉप काउंट्स, माय होम इज ग्रीन, द यंग गार्डीयन्स हे चित्रपट विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले.
एकूण ३० ते ४० फिल्म्स या ‘किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’त दाखवण्यात येणार असून किर्लोस्कर व वसुंधरा क्लब्स यांच्या पुढाकाराने होणारा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे लघुपट, अनुबोधपट आणि पर्यावरण विषयक अन्य उपक्रम यांनी सजलेला हा भारतातील एकमेव महोत्सव आहे. ‘वसुंधरा जगवा, तगवा आणि भावी पिढ्यांसाठी तिचे संवर्धन करा’ हा संदेश असलेला हा महोत्सव पर्यावरण, वन्यजीवन, ऊर्जा, हवा, व पाणी या विषयांना समर्पित आहे.
दरम्यान, रामदास कोकरे यांना जाहीर झालेला वसुंधरा सन्मान पुरस्कार प्रसिद्ध मराठी अभिनेते व नाम फाउंडेशनचे संस्थापक मकरंद अनासपुरे आणि श्वास या ऑस्कर नामांकित चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप सावंत यांच्या हस्ते २३ ऑगस्ट बुधवारी कुसुमाग्रज स्मारक येथे पुरस्कार प्रदान सोहळा सायंकाळी पाच वाजता पार पडणार आहे. यावेळी निसर्ग मित्र मंडळ, श्री विजय सांबरे आणि चातक नेचर काँझर्वेशन सोसायटी यांना वसुंधरा मित्र पुरस्कारांचेही प्रदान होणार आहेत. या सोहळ्यानंतर नाम फाउंडेशनची माहिती देणारा ३० मिनिटाचा माहितीपट आणि संदीप सावंत दिग्दर्शित ‘नदी वाहते’ या ११४ मिनिटाच्या चित्रपटाचा प्रीमिअर शो होणार आहे.
उद्घाटन प्रसंगी यावेळी किर्लोस्कर ऑइल इंजिनचे मकरंद देवधर, देवेंद्र देवरे, शोकेस व कुसुमाग्रज फिल्म सोसायटीचे हेमंत बेळे, योगेश एकबोटे, अमित टिल्लू, यतीन कुलकर्णी, मातले विद्यालयाचा मुख्याध्यापक मझदे सर आदी उपस्थित होते. या महोत्सवातील सर्व माहितीपट, लघुपट बघण्यासाठी महोत्सवाच्या व्यवस्थापकांनी नाशिककरांना आमंत्रित केले असून या महोत्सवाचा आनंद घेण्याचे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.