शिवसेनेचे नेते व माजीमंत्री सुरेशदादा जैन यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून बुधवारी नियमित जामीन मंजूर झाला आहे. तत्कालीन जळगाव नगरपालिकेच्या घरकूल घोटाळ्यात 10 मार्च 2012 मध्ये सुरेशदादांना अटक झाली होती. उच्च न्यायालयाने नियमित जामीन दिल्याने सुरेशदादा यांचा जळगाव येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.Jalgaon Gharkul scam
तत्कालीन जळगाव नगरपालिकेच्या घरकूल घोटाळ्यात 10 मार्च 2012 मध्ये सुरेशदादा जैन यांना अटक झाली होती. या घोटाळ्यात शिक्षा झाल्यानंतर ते जवळपास साडेचार वर्षे तुरुंगात होते. दरम्यानच्या काळात सुरेशदादांना सप्टेंबर 2016 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने जामीन दिला होता. पण त्यात न्यायालयाने मुंबईत राहण्याची अट घातली होती. जळगावात येण्यास त्यांना प्रतिबंध घालण्यात आला होता.
जळगावमधील घरकुल प्रकरणी सुरेशदादा जैन यांच्यासह अन्य आरोपींना धुळे जिल्हा न्यायालयाने आरोपांत दोषी ठरवून सात वर्ष कारावासाची शिक्षा आणि शंभर कोटी रुपये दंडही सुनावला होता. जैन यांच्यासह आरोपींची नाशिक कारागृहात रवानगी करण्यात आली होती. यातील काही अपवाद वगळता इतरांना जामीन मंजूर करण्यात आला होता. मात्र प्रमुख आरोपी सुरेशदादा जैन यांना दिलासा मिळालेला नव्हता. त्यांना नंतर उच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला होता. जैन यांनी शिक्षेविरोधात उच्च न्यायालयात अपिलही दाखल केले आहे.Jalgaon Gharkul scam
प्रकरण काय आहे ?
या घरकुल योजनेत सुमारे पाच हजार घरांची बांधणी होणार होती. मात्र अवघी १५०० घरेच बांधण्यात आली. बांधकामव्यावसायिक आणि अधिकाऱ्यांशी हातमिळवणी करून आरोपींनी संगनमताने यामध्ये गैरप्रकार केला असा आरोप आहे. २००६ मध्ये तत्कालिन महानगरपालिका आयुक्तांनी याबाबत रितसर तक्रार केली होती. जैन यांना याप्रकरणी मार्च २०१२ मध्ये अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना सर्वोच्च न्यायालयातून अंतरिम जामीन मंजूर झाला होता.
नियमीत जामीन मंजूर झाल्यामुळे सुरेशदादा जैन हे आता कुठेही फिरू शकतात, ते आता जळगाव येथेही लवकर येतील, असेही त्यांच्या निकटवर्तीयानी सांगितले. जैन यांचा जळगाव जिल्ह्याचे नव्हे तर राज्याच्या राजकारणात एक वेगळा दबदबा होता. जळगाव विधानसभा मतदार संघातून सलग नऊ वेळा ते निवडून आले होते. सन १९८५ पासून जळगाव पालिकेवर त्यांचे तब्बल ३० वर्षे वर्चस्व होते.
आताही त्यांच्या नेतृत्वाखालील जळगाव महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. या शिवाय सहकार क्षेत्रातही त्यांनी आपले वर्चस्व निर्माण केले होते,जळगाव जिल्हा बँकेचे ते चेअरमनपदही त्यांनी भूषविले आहे. जळगाव नगरपालिकेच्या घरकुल गैरव्यवहार प्रकरणी ते वैद्यकिय जमिनावर होते, त्यामुळे ते पूर्णपणे राजकारणापासून अलिप्त आहेत. ते राजकारणापासून अलिप्त असले तरी त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या कट्टर समर्थकांनी सन २०१८ मध्ये जळगाव महापालिकेत शिवसेनेने निवडणूक लढविली, भाजपपुढे त्यांचा पराभव झाला. केवळ पंधरा जागा शिवसेनेला मिळाल्या. मात्र पुढे अडीच वर्षात भाजपचे नगरसेवक फुटले आणि त्यांनी शिवसेनेला पाठींबा दिला, शिवसेनेच्या जयश्री महाजन महापौर झाल्या. त्यामुळे आजही महापालिकेत सुरेशदादांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची सत्ता असल्याचे सांगण्यात येते.
सुरेशदादा राजकारणापासून अनेक वर्षे अलीप्त असल्यामुळे जळगावच्या राजकीय क्षेत्रात नेतृत्वाची मोठी पोकळी आहे. नियमीत जामीन मिळाल्यामुळे ते आता जळगावात येवू शकतात. मात्र राजकारणात पुन्हा सक्रिय व्हायचे की नाही, याबाबतचा संपूर्ण निर्णय त्यांच्याच मतावर अवंलबून आहे. मात्र त्यांचे कार्यकर्ते अद्यापही सुरेशदादा राजकीय क्षेत्रात पुन्हा पर्दापण करण्याच्या प्रतिक्षेत आहेत. ते पुन्हा राजकारणात सक्रिय झाल्यास जळगावच्या राजकारणात मोठा उलटफेर होईल.Jalgaon Gharkul scam