काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि इंटकचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांचं निधन झालं. नाशिक येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान, मंगळवारी रात्री उशिरा त्यांची प्राणज्योत मालवली. मंगळवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. हृदयविकाराचा धक्का आल्याने त्यांना नाशिकमध्ये एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले, तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती आहे. ते ७५ वर्षांचे होते .Jaiprakash Chhajed Passes Away At Nashik
इंटकचे प्रदेशाध्यक्ष आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे नाशिकच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. उपचार सुरू असतानाच, मंगळवारी रात्री उशिरा त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी काँग्रेस भवनमध्ये ठेवण्यात येणार आहे. आज (बुधवारी) संध्याकाळी नाशिक अमरधाम मध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
जयप्रकाश जितमल छाजेड यांची तब्येत गेल्या काही दिवसांपासून ठीक नव्हती. तरीही ते नागपूर येथे काँग्रेसच्या बैठकीसाठी जाण्यासाठी निघाले होते, कुटुंबीयांनी त्यांच्या प्रकृतीविषयी काळजीही व्यक्त केली. त्यानंतर काही वेळातच छाजेड यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आला. त्यांना कुटुंबीयांनी नाशिकमधीलच एका खाजगी रुग्णालयात दाखल केले, परंतु तिथेच त्यांनी प्राण सोडले. छाजेड यांच्या मृत्यूची बातमी समजताच नागपूरला कॉंग्रेसच्या बैठकीसाठी गेलेले सर्व पदाधिकारी नाशिकला परतले.
जयप्रकाश छाजेड हे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी एक होते. काँग्रेसचा निष्ठावान कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख होती. युवक काँग्रेसपासून त्यांनी राजकीय कारकिर्दीचा श्रीगणेशा केला. त्यांनी पक्षात शहर आणि प्रादेशिक पातळीवर अनेक संघटनात्मक पदं भूषवली होती.
जयप्रकाश छाजेड तीन वेळा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे ते निकटवर्ती मानले जात.विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना छाजेड यांची विधानपरिषदेवर आमदार म्हणून नियुक्ती झाली होती. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि नाशिकच्या माजी उपमहापौर शोभा छाजेड, मुलगा प्रीतिश हितेंद्र आणि आकाश असा परिवार आहे.Jaiprakash Chhajed