काय सर? काय चाललंय? या साध्या प्रश्नाला समोरून उत्तर आलं. सर, तेवढं म्हणू नका ओ, शिवी दिल्यागत वाटतंय. एवढी सर या शब्दाची चीढ बघून थोडंसं विशेष वाटलं. पण, एका बिन पगारी (विनावेतन) उच्च माध्यमिक (ज्यू. कॉलेज) ला अध्यापन करणाऱ्या शिक्षकाची व्यथा ऐकून या ‘सर’ शद्बाबद्दल त्यांच्या मनात एवढा राग का? याचे उत्तर मिळाले.
घरची परिस्थिती बेताची असताना, स्वत:च्या कष्टावर उच्च शिक्षणापर्यंत मजल मारली. कधीतरी शिक्षक व्हायचं स्वप्न उराशी बाळगलं होतं. त्यासाठी लागणार्या सर्व पदव्या मिळवल्या. पण, आजपर्यंतही सन्मानाने ‘सर’ म्हणवून घ्यायची लाज वाटते. अशा शब्दात एक उच्च विद्याविभूषित तरूण बोलत होता.
पाचवीपासून ते एमएच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी सरकारने जे कॉलिफिकेशन ठरवून दिले. ते सर्व पूर्ण केलं. बीए केलं. बीएड केलं. एमए, सेट, नेट, पीएच.डी सुद्धा केली. प्राध्यापक नाही तर, शिपायाची तरी नोकरी मिळेल अशी आशा घेऊन वाटच बघत राहिलो. सन्मानाने जगण्यासाठी कोणते कॉलिफिकेशन आहे. तेच समजत नाही, असे तो म्हणाला.
गावातील शाळेत दहावी पर्यंतचं शिक्षण केलं. उच्च माध्यमिक आणि पदवी, पदव्युत्तर शिक्षणही कमवा व शिका योजनेतून केलं. तेव्हाच कधीतरी शिक्षक व्हायचं स्वप्न पाहिलं होतं. त्यानुसार सीईटी देऊन एका चांगल्या कॉलेजमध्ये बीएडसाठी प्रवेश मिळवला. चांगल्या गुणांनी बीएड उत्तीर्ण झालो. त्याच काळात राज्य सरकारनं शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) सुरू केली. पुन्हा आशावादी झालो. आता ही परीक्षा पास झालो की मिळेल नोकरी या भाबड्या आशेनं. ‘टीईटी’ही पहिल्याच प्रयत्नात पास झालो. त्यानंतर सरकार शांत झालं. माझ्या आशावादी जीवनाचा पुढचा प्रवास सुरूच होता.
एमए, बीएड झालो तरी नोकरी नाही. टीईटीचाही उपयोग नाही. म्हणून शेतात कामाला जाण्यास सुरूवात केली. शिक्षक होण्याची इच्छा स्वस्थ बसू देत नव्हती. पुन्हा सहायक प्राध्यापक पदासाठीची पात्रता परीक्षा ‘सेट’ व ‘नेट’ची तयारी सुरू केली. दरम्यान, पीएच. डीला प्रवेश घेऊन डॉक्टर होण्याचंही स्वप्न पाहिलं. केवळ शिक्षण जगवू शकत नाही, त्यामुळे नोकरी शोधतच होतो, असा प्रवास तो सांगत होता.
एका खासगी ज्यू कॉलेज म्हणजेच उच्च माध्यमिक शाळेत रूजू झालो. १४ वर्षांपासून काम करतोय, ११ वर्षांपूर्वी शिक्षण विभागाने वैयक्तिक मान्यताही दिली पण सदर शिक्षकांचे वेतन शासकीय कोषागारामधून देय ठरत नाही असा शेरा मारून मान्यता दिलीय. एकीकडे समान काम समान वेतन चे नारे देणाऱ्या भारतीय लोकशाहीत तेच समान काम करणाऱ्या आमच्या सारख्या विनावेतन काम करायला भाग पाडणाऱ्या या सर शब्दाची लाजच नाही तर शिवी दिल्यासारखे वाटते. मग तुम्हीच सांगा. शासन व संस्था दोघांचाही एक रुपयाही न घेता आयुष्याची २५-२६ वर्षे शिक्षणात व बाकीचे विणावेतन सेवेत घालवलेल्या तरुणाने करायचे काय? आणि जगायचं कसं? आई – वडील, भाऊ, बहिणी, बायको, मुलामुलींच्या अपेक्षा कशा पूर्ण करायच्या? आज वय ३८ – ३९ वर्ष अर्धे आयुष्य संपले, माझी ७ वर्षांची मुलगी अडीच वर्षाच्या मुलाला समजावते : दादा, पप्पांना अजून पगार नाही, आपण आईसक्रीम नंतर घेऊ, पगार सुरू झाल्यावर…
तीच ७ वर्षांची मुलगी मम्मीला विचारते: मम्मी पप्पांना खरच पगार सुरू होईल का? आता हा प्रश्न विचारात पाडणारा होता.
प्राध्यापक म्हणून राहायचं म्हटलं तरी पदरमोड करावी लागते. एवढं शिकूनही घरी पैसे मागून राहावं लागतं. कधी कधी जगण्याचीही लाज वाटते. गावी गेलं तरी लोक विचारतात. काय कराताय सर? झालं का नाही शिक्षण? अजून किती राहिलंय शिकायच? पगार चालू झाला का? मग याच ‘सर’ शब्दाची लाज वाटते. एवढंच नाहीतर कुणी सर म्हटलं तर तो सन्मान नाही तर शिवी वाटते…. (डोळ्यातून पाणी आल्याने टाईप करणे शक्य नाही, बाकी नंतर….)
हे शिक्षण व्यवस्थेचे आणि शिक्षणाचे वास्तव, एक उच्च विद्याविभूषित तरुण. शिक्षक होण्यासाठी झगडणारा आणि शिक्षक होण्याचा ध्यास घेतलेला एक तरुण. कदाचित थोड्याफार फरकाने असेच आशादायी तरुण राज्यात अनेक आहेत. शिक्षक होण्यासाठी पैसे भरण्याची ऐपत नसलेले माझ्यासारखे…..
मनोगत :श्री देवरे
ज्यू. कॉलेज विनाअनुदानित शिक्षक (१४ वर्ष बिनपगारी सेवेत)