ylliX - Online Advertising Network

कर्जमुक्ती केल्यास सरकारला धक्का लागू देणार नाही – उद्धव ठाकरे

नाशिकमध्ये शिवसेनेचा कृषी मेळावा शिवसेनेकडून ‘मी कर्जमुक्त होणारच’ चा नारा

उद्धव ठाकरे शिवसेनेचे कृषी अधिवेशन

कर्जमाफी केल्यास सरकारला धक्का लागू देणार नाही – उद्धव ठाकरे

नाशिक : राज्यात सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेने पुन्हा एकदा भाजप विरुद्ध बंडाचे निशाण उभारले आहे. आता शेतकऱ्यांची कर्जमाफी करा, आम्ही बाहेरुन विनाशर्त पाठिंबा देतो, कर्जमाफी केल्यास सरकारला धक्का लागू देणार नाही, असं म्हणत पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यासमोर आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी तूर खरेदी, समृद्धी मार्ग, बुलेट ट्रेन, नोटाबंदी अशा सर्व विषयावर बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारवर टीका केली.

शहरातील चोपडा लॉन्समध्ये शिवसेनेकडून कृषी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी आणि कॉंग्रेस माजी मंत्री वनाधिपती विनायकदादा पाटील हे यांनीही उपस्थिती लावली. त्यामुळे वेगळ्या राजकीय समीकरणाची चर्चा सुरु झाली.

सत्तेतून आम्ही बाहेर पडू

या पुढे देशामध्ये एकतर्फी मन की बात ऐकणार नाही, शेतकऱ्याला पण मन आहे आणि त्याला बोलतं करण्यासाठी आज त्यांना बोलावलंय असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांसोबत मनमोकळा संवाद साधला. मुंबई-नागपूरला जोडणारा समृद्धी महामार्ग हे मुख्यमंत्र्यांचे स्वप्न आहे. मात्र शेतकऱ्यांच्या जीवावर उठणारी समृद्धी नको, शेतकऱ्याला उध्वस्त करणारा महामार्ग नको असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी या महामार्गाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचं सांगितलं.

मेळाव्याला संबोधित करतांना उद्धव ठाकरे यांनी सांगितले की सत्ता बदल होण्याच्या आधीही शेतकरी रडत होता आणि आता सुद्धा रडतच आहे. मात्र यापुढे रडणार नाही तर रडवणार आहे. भाजपकडून नुकतीच मध्यावधी निवडणुकीसाठी चाचपणी करण्यात आली. शेतकरी कर्ज मुक्त करा, माझे सर्व मंत्री सत्ता सोडून बाहेर पडून तुम्हाला सत्तेसाठी पाठिंबा देऊ असं उद्धव ठाकरे बोलले.

भाजपा खरा शेतकरी कर्ज मुक्तीचा अभ्यास करत नाही तर निवडणुका झाल्या तर किती निवडून येतोय हे चाचपणी करतोय. मात्र मला शिवसेनेला सत्तेला लाथ मारायला मला एका क्षणाचाही विलंब लागणार नाही असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कर्जमाफीच्या मुद्यावरुन सत्तेतून बाहेर पडण्याची धमकी दिली आहे.

आम्ही सत्तेत का ?

आम्हाला विरोधक प्रश्न विचारतात तुम्ही सत्ता का सोडत नाहीत, तर सत्तेत का राहता. मात्र आमची बांधिलकी समाज आणि शेतकऱ्यांशी आहे त्यामुळे सरकारकडून कामे करवून घेणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री विरोधात असताना कर्ज माफी मागायचे आता सत्तेत आल्यानंतर त्यांचे अभ्यासू विद्यार्थ्यांत रूपांतर झाले आहे असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. सरकार बदलले पण प्रश्न सुटत नाही. मध्यावधीसाठी चाचपणी काय करताय.

कृषी मालाचा भाव ठरवणारा आयोग सरकारच्या हातातले खेळणे – राजू शेट्टी

तुरीचा घोटाळा सरकारने केला  

तुर डाळीमुळे शेतकरी मेटाकुटीस आणि सरकार सत्तातुर झाले आहे. शेतकरी रोज मारतोय. केंद्रीय कमिटीने सांगितले होते की तुरीचे उत्पादन खूप मोठ्या प्रमाणत होणार असून,राज्य आणि केंद्राने तयारी सुरु केली पाहिज. तुमचीच कमिटी जर सांगतेय तर तयारी एका केली नाही. फक्त सत्ता उपभोगणे सुरु आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांना विसरून सदाभाऊ का तिकड़े जाऊन बसले?
डाळ आयात करून शेतकऱ्यांना अडचणीत आणणारे सरकार गुन्हेगार आहे. कोणत्या सुपीक डोक्याने तूर डाळ आयात केली त्याला शोधा उगीच शेतकऱ्यायात गुंतवू नका असेही मात्र ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.

साल्याची सालपट काढली पाहिजे

भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे विधान ऐकून माझी तळ पायाची आग मस्तकात गेली होती. शेतकरी रडणार नाही, साल्यांची सालपटं काढणार असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दानवेंना लगावला आहे..यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी कर्जमाफी केल्यास सरकार पडू देणार नाही.

समृद्धी मार्ग

समृद्धी मार्ग दोन्ही राजधानी जोडणार पण शेतकऱ्यांना अडचणीत आणून कसला हवा हा मार्ग? माझ्या दोन राजधान्या एकत्र येतील आनंद आहे. मात्र जागा बळकावून कोणती प्रगती सरकार करणार आहे. शेतकरी वर्गाला अडचणीत आणून कोणतही प्रगणी होणार नसून शिवसेनेचा या मार्गाला विरोध आहे असे ठाकरे यांनी समृद्धी मार्गावर आपले मत व्यक्त केले,

मोदींवर टीका

उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही टीका करत विदेशातून काळा पैसा आणून देणार होते त्याचे काय झाले ? ते आणून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा. शेतक-याला कर्जमुक्त करु नका, पण त्याच्या खात्यात स्विस बँकेतील 15 लाख आधी टाका अशी मागणी केली आहे.

विधान भवनावर शेतकरी भव्य मोर्चा

आजचे आंदोलन सभा ही सुरुवात आहे. प्रत्येक ठिकाणी शिवसेना या प्रकारे शेतकरी वर्गाला एकत्र करणार आहे. एक महिना मुदत सरकारला आहे. त्यानंतर मी स्वतः शेतकरी वर्गाचा महामोर्चा विधानभवनावर घेवून जाणार आहे. शेतकरी कर्ज मुक्ती झालीच पाहिजे हीच शिवसेनेची भूमिका आहे असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.