दुर्गजागृती व्याख्यानमालेत ज्येष्ठ व्याख्याते नंदन रहाणे यांचे प्रतिपादन
नाशिक : नाशिक हा ६५ हून अधिक उतुंग गडकिल्ल्यांचा जिल्हा आहे. या गडकिल्ल्यांवर शहाजीराजे यांचे प्रभुत्व वास्तव होते. शिवरायांच्या स्वराज्यात याच गडकोटांचे मोलाचा वाटा आहे. अनेक लढाया याच भूमीत झाल्या. राजा शिवबा स्वतः याच भूमीतून सुरतेच्या मोहिमेला गेले ही भूमी प्रभू रामचंद्राची भूमी म्हणून आपण जाणतो. राम कृष्णाची नीती असलेल्या शिवबाने मिळवून दिलेले भगव्या ध्वजाचे हिंदवी स्वराज्य याच गडकोटांनी मिळवून दिले. हिंदवी स्वराज्याची मूर्तिमंत रुपेच आजचे गडकोट आहेत. हे गडकोट संवर्धन करण्याचे परिश्रम, घाम गाळण्याचे काम करणारी शिवभक्ती शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था करते हे अत्यंत मौलिक कार्य आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ इतिहास कवी व्याख्याते नंदन रहाणे यांनी केले.
नाशिक येथे (दि.१२ जून २०१७) झालेल्या दुर्ग जागृत्ती व्याख्यानमालेच्या १५ व्या पुष्पात केले. शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेच्या माध्यमातून नाशिकच्या हुतात्मा स्मारकात झालेल्या झालेल्या दुर्गजागृत्ती व्याख्यान मालेच्या १५ व्या पुष्पात ‘शिवजागर दुर्गजागर’ या विषयावर ज्येष्ठ शिवकवी नंदन रहाणे बोलत होते.
व्याख्यानाच्या प्रारंभी छत्रपती शिवरायांचे अमात्य रामचंद्र यांनी लिहिलेल्या आज्ञापत्राची आठवण देत ‘संपूर्ण राज्याचे सार हे दुर्ग’ असे सांगून आज्ञापत्र वाचून त्यातील दाखल्यांची माहिती दिली.
कवी रहाणे यांनी सांगितले की, गडकिल्ले हे केवळ दगड मातीचे बनलेले नसून तेच या भूमीचे रक्षणकर्ते आहे. आपल्या हयातीत ८० वर्षे बादशहा औरंगजेब या भूमीत आह:कार माजवीत होता. अनेक शाह्या ही भूमी लुटत होत्या. अशा काळात शहाजी राजांचे स्वराज्याचे स्वप्न साकार करण्यात राजा शिवबाचा जन्म शिवनेरीवर झाला आणि या भूमीचे भाग्य उजळले.
शेतकऱ्यांच्या पोरांना सोबत घेवून त्यांच्यात स्वराज्य स्थापनेची ज्वाला भिनवून शूरवीर मावळे याच भूमीत लढले. त्याकाळी शेतकरी शिवरायांचे बोलावणे आले की हातातली कामे टाकून मोहिमेला आनंदाने निघायचे. हा त्याग त्यांच्या अंगी होता. कारण शिवबा रयतेचे तारणहार होते, आधार होते. शिवरायांचे हिंदवी स्वराज्य अबाधित राखण्यासाठी शिवशंभू संभाजी महाराजांनी औरंगजेबाला टक्कर दिली, हैराण केले असे सांगत रहाणे यांनी मावळ्यांचे परिश्रम अधोरेखित केले.
सत्तेच्या वतनाच्या लालसेपोटी इथल्याच फंद फितुरीने राजपुत्र संभाजीराजा शत्रूच्या ताब्यात सापडले. मातृभूमीसाठी त्यांचा ही देह धरतीला मिळाला. त्याकाळी गडकिल्ले जसे समृद्ध तशी रयत ही सुखी समाधानी होती. प्रसंगाला भिडणारी रयत शिवरायांच्या पाठीशी ठाम उभी होती. गडकोटांची भूमी असलेली महाराष्ट्र भूमी असलेला महाराष्ट्र अशी या भूमीची मूळ ओळख आहे आणि त्या गडकोटांचे अस्तित्व टिकवण्यासाठी घाम गाळणारे गडसंवर्धक खऱ्याखुऱ्या अर्थाने शिवकार्य करीत आहे. हे पवित्र कार्य असेच वाढो असे सांगत समारोपाला नंदन रहाणे यांनी आपल्या वयाच्या २३ व्या वर्षी लिहिलेलं राजा शिव छत्रपती या महानाट्यात सादर होणारे आई जिजाऊने आई जगदंबेला केलेल्या आळवणी बद्दल ऐतिहासिक काव्य सादर केले.
यावेळी शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेचे संस्थापक राम खुर्दळ, संयोजक योगेश कापसे, निमंत्रक सोमनाथ मुठाळ, डॉ. संदीप भानोसे, सल्लागार कचरू वैद्य, पर्यावरण मित्र यशवंत धांडे, गणेश सोनवणे, संकेत नेवकर, निलेश ठुबे, नाना बच्छाव, प्रकाश चव्हाण, कुमार कडलग, सागर बोडके यासह दुर्गभक्त उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व परिचय डॉ.संदीप भानोसे तर सूत्रसंचालन योगेश कापसे यांनी केले. आभार प्रा. सोमनाथ मुठाळ यांनी मानले.