नाशिक : स्वतःच्या इच्छेविरुद्ध मुलीने आंतरजातीय विवाह केल्याने समाजात बदनामी होईल म्हणून आपल्या गरोदर मुलीचा खून करणाऱ्या बापाला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने हा निकाल दिला आहे. सीआरपीसी कलम २४८ (२) नुसार त्याला दोषी ठरविण्यात येऊन आरोपी कुंभारकरला मरेपर्यंत फाशी सह जन्मठेप करण्यात आली आहे.
नाशिक शहरात २८ जून, २०१३ मध्ये हा ऑनर किलिंगचा प्रकार घडला होता. आरोपी एकनाथ किसन कुंभारकर (रा. मोरे मळा, पंचवटी) याने गरोदर असणाऱ्या प्रमिलाचा खून केला होता. त्याने सकाळी ७:३० ते ७:४५ वाजता घडलेल्या या घटनेत आपल्या मुलीला घरी घेऊन जाण्याच्या बहाण्याने सोबत नेले. केटीएचएम कॉलेज जवळील सावकार हॉस्पिटल समोर दोरीच्या सहाय्याने मुलीचा गळा आवळून खून केला. त्यात त्या मुलीच्या गर्भातील अर्भकाच्याही मृत्यूला हा आरोपी कारणीभूत ठरला.
त्यामुळे या घटनेबाबत नाशिककर नागरिकांमध्ये रोष होता. नाशिकमध्ये ऑनर किलिंगचा एवढा भयानक प्रकार प्रथमच समोर आला होता. अखेर चार वर्षांनी या घटनेतील मुलीला न्याय मिळाल्याचे चित्र आहे.
आरोपीस भारतीय दंड विधान कलम ३०२ प्रमाणे मरेपर्यंत फाशी तसेच भा. दं. वि. कलम ३१६ प्रमाणे १० वर्षे सक्तमजुरी तसेच भा. दं. वि. कलम ३६४ प्रमाणे जन्मठेपेची शिक्षा ठोठाविण्यात आली आहे.
या घटनेनंतर एकनाथ कुंभारकरला तत्काळ अटक करण्यात आली होती. सरकारवाडा पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक राजेश आखाडे यांनी साफैदारपणे तपास केला. तर पौर्णिमा नाईक यांनी सरकारी वकील म्हणून कामकाज पाहिले.
———- ———- ———
आमचे फेसबुक पेज लाईक करा : NashikOnWeb – Facebook
तुमच्या बातम्या आम्हाला मेल करा : news@nashikonweb.com आणि nashikonweb.news@gmail.com वर