नाशिक : नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांना त्यांच्याच मतदारसंघात आव्हान मिळण्याची शक्यता आहे. माजी मंत्री प्रशांतदादा हिरे यांचे पुत्र आणि भाजप युवा मोर्चाचे नेते डॉ.अद्वय हिरे हे भाजपला सोडचिठ्ठी देऊन ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. नाशिक मध्ये मोठ्या प्रमाणात ठाकरे गटाला धक्के बसल्यानंतर आता ठाकरे गटानं भाजपला मालेगाव मध्ये मोठा धक्का दिला आहे. याचबरोबर हिरे यांच्या ठाकरे गटात प्रवेशानंतर शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांच्या समोर देखील आव्हान निर्माण होणार आहे.
नाशिकमधील भाजप (BJP)युवा मोर्च्याचे नेते डॉ. अद्वय हिरे (Advay Hiray)हे भाजपला जय महाराष्ट्र करत ठाकरे गटात लवकरच प्रवेश करणार आहेत. मुंबईत मातोश्री येथे २७ जानेवारीला हा पक्षप्रवेश होणार आहे. डॉ.अद्वय हिरे यांच्यासोबत मालेगावमधील हजारो कार्यकर्ते ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याने भाजपसाठी हा मोठा धक्का आहे.
डॉ.अद्वय हिरे यांनी काही दिवसांपूर्वी नाशिकमधील कार्यकर्त्यांची बैठक घेऊन संवाद साधला. यावेळी त्यांच्या समर्थकांनी ठाकरे गटात प्रवेश करण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत भेट घेऊन त्यांनी भाजपला सोडचिट्ठी देत असल्याचे जाहीर केले होते.

दादा भुसे विरुद्ध अद्वय हिरे असा सामना
ठाकरे गटात बंड करून दादा भुसे शिंदे गटात गेल्यामुळे नाशिकमध्ये नाराजीचे वातावरण आहे. याचाच फायदा डॉ. हिरे यांना होणार असल्याची चर्चा आहे. डॉ. हिरे हे हजारो कार्यकर्त्यांसह ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याने मालेगावात भाजपची ताकद कमी होणार असून ठाकरे गटाला दादा भुसे यांच्याविरोधात मोठा फायदा होणार आहे. दादा भुसे यांना शह देण्यासाठी ठाकरे गटाची ही रणनीती आहे. त्यामुळे आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीमध्ये मालेगावात दादा भुसे विरुद्ध अद्वय हिरे असा सामना पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
डॉ.अद्वय हिरे माजी मंत्री प्रशांत दादा हिरे यांचे पुत्र असून ते २००९ पासून भाजपमध्ये आहेत त्यांनी भाजप कार्यकर्ता म्हणून अनेक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला आहे. अनेक ठिकाणी आंदोलन केली आहेत. डॉ.हिरे हे जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर जिल्हा कृषी औद्योगिक संघाचे ते चेअरमन देखील आहेत.
डॉ. हिरे हे हजारो कार्यकर्त्यांसह ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याने मालेगावात भाजपची ताकद कमी होणार असून ठाकरे गटाला दादा भुसे यांच्या विरोधात मोठा फायदा होणार असल्याचं म्हटलं जात आहे. शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांना शह देण्यासाठी ठाकरे गटाची रणनीती असल्याचे देखील म्हटलं जात आहे. त्यामुळे आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीमध्ये मालेगावात दादा भुसे विरुद्ध अद्वय हिरे असा सामना पाहायला मिळू शकतो