नाशिक : दिवाळी व इतर सणांच्या कालावधीत अपायकारक फटाक्यांमुळे होणाऱ्या ध्वनी व हवा प्रदुषणाचे जनतेवर होणारे परिणाम रोखण्यासाठी पोलिस आयुक्त रविंद्रकुमार सिंघल यांनी नाशिक पोलिस आयुक्तालय क्षेत्रात पर्यावरण (संरक्षण) कायदा 1986 अंतर्गत नियम व सुधारीत नियम 89 ची अंमलबजावणी करण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे.
मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे कलम 33 (1)(यु) द्वारे प्राप्त अधिकारांचा वापर करुन हे मनाई आदेश देण्यात आले आहेत. अधिसूचनेनुसार फटाके उत्पादक, विक्रेते व नागरीकांनी नियमांचे पालन करावे. रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत फटाके उडविण्यास, फटाक्याचे दारुकाम करण्यास किंवा वापरण्यास बंदी आहे. याचबरोबर फटाक्यांची दुकाने (स्टॉल), त्यातील फटाक्यांचा साठा, फटाक्यांचे प्रकार याबाबत नियमांची अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या आदेशांचा भंग केल्यास कलम 131(ख)(1) अन्वये कारावासाची व दंडाची शिक्षा करण्यात येईल.