नाशिक : आयपीएस अधिकारी असल्याचे सांगून कार चालकाला आणि हॉटेल चालकाला फसविल्याप्रकरणी मुंबई येथील २५ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आले आहे. या प्रकरणातील संशयीताचे नाव अमित अंबिका सिंग असे आहे. तो मुंबईतील मुलुंड भागातल्या पत्रा चाळ येथे राहतो.संशयित अमित सिंग याने मुंबई येथून १६ मार्च रोजी कार भाड्याने घेतली तो प्रवास करत नाशिक येथे आला होता. नाशिक येथील मुंबई नाका परिसरातील हॉटेल एसएसपी येथे तो थांबला होता.fake ips officer arrested nashik police two cheating cases registered
या प्रकरणात १६ मार्च ते २९ मार्च या कालावधीत कारचे किलो मीटर नुसार १ लाख ७२ हजार रुपये भाडे झाले होते. ही बाब कार चालकाने लक्षात आणून दिली, मात्र उलट पैसे देण्या ऐवजी अमित सिंग याने चालकाकडून अधिकारी आहोत हे भासवत १० हजार रुपये घेतले होते. चालक जयप्रकाश मौर्य याला शंका आली असता त्याने सरकारवाडा पोलिस स्टेशन येथे ही आय.पी.एस. अधिकारी बाब सांगितली तेव्हा पोलिसांनी चौकशी केली असता हे सर्व खोटे निघाले. चालक मौर्य याने दिलेल्या फिर्यादी नुसार पोलिसांनी सिंग याला अटक केली आहे. तर सिंग हा ज्या हॉटेल मध्ये थांबला होता त्याचे बिल ४० हजार ६६३ रु. इतके झाले होते. हॉटेलचे संचालक अविनाश दिलीप देशमुख यांनी मुंबई नाका पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे. संशयित अमित सिंग वर शहरात दोन गुन्हे दाखल झाले आहेत. सरकारवाडा पोलिसांनी तोतया आयपीएस अधिकार्याला अटक केली. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.