नाशिक : सरकारवाडा पोलीस ठाण्यात एका आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचे न्यायालयात चार्जशीट दाखल आहे. यात पुरवणी चार्जशीट दाखल करताना साक्षीदार असलेल्या व्यक्तीला आरोप न करण्यासाठी गुन्ह्याचे तपास अंमलदार असलेल्या निवांत जगजीतसिंग जाधव या पोलीस उपनिरीक्षकांनी ५०००० रुपयांची लाच मागितली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना ही लाच घेताना हातोहात पकडले आहे.
अधिक माहिती अशी की, ७३/२०१७ अशा क्रमांकाने दाखल असलेल्या गुन्ह्याप्रमाणे बनावट संस्था तयार करून नागरिकांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस येऊन याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणाची पुरवणी दोषारोपपत्र दाखल करताना तक्रारदारास आरोप न करता पुरवणी दोषारोपपत्रातून नाव वगळण्यासाठी ५० हजारांची लाच जाधव यांनी तक्रारदारांकडे मागितली होती.
त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला असता पडताळणी करून त्यानुसार सापळा रचून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी टाकळी रोड येथे पोलिस उपनिरिक्षक निवांत जाधवला आज (दि.१७) 50 हजार रुपयांची लाच स्वीकारताना हातोहात पकडत अटक केली.