शोक संदेश :राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते ए.टी.पवार (दादा) यांचे निधन

         शोक संदेश  

ए.टी.पवार यांच्या निधनामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील ज्येष्ट व चतुरस्त्र व्यक्तीमत्व हरपले

– छगन भुजबळ

नाशिक,दि.१० मे:- ए.टी.पवार यांच्या निधनाची अत्यंत दु:खद बातमी मला नुकतीच समजली त्यांच्या निधनामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील ज्येष्ट व चतुरस्त्र व्यक्तीमत्व हरपले असल्याचे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

 छगन भुजबळ यांनी दिलेल्या शोक संदेशात म्हटले आहे की, श्री.एटी.पवार हे सतत आठ वेळा विधानसभेवर निवडून गेले होते. आदिवासी विभागाच्या मंत्री पदाची तसेच पशुसंवर्धन दुग्धविकास, राज्यमंत्री पदाची जबाबदारी त्यांनी उत्तमपणे संभाळली होती. त्यांचे कळवणसह नाशिकच्या विकासात मोठे योगदान आहे. विकासपुरुष व पाणीदार नेता म्हणून त्यांची ओळख होती. कळवण विधानसभा मतदार संघात जलसिंचनाद्वारे त्यांनी आदिवासी बांधवाच्या घरात विकासाची गंगा आणली आहे.

 स्वतंत्र आदिवासी विकास मंत्रालयाची स्थापना करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. गेली चार दशके कळवणच्या सार्वजनिक क्षेत्रात चतुरस्त्र व्यक्तीमत्व म्हणून ए.टी. पवार यांचा नावलौकिक होता. साधी राहणी, उच्च विचारसरणी असलेल्या ‘ए.टी.’ यांनी दळवट ते मुंबई असा राजकीय प्रवास करतांना अनेक राजकीय पदे सांभाळतांना प्रामाणिकपणे पदांना न्याय दिला. ते आदिवासी खात्याचे मंत्री असतांना त्यांनी अनेक लोकोपयोगी योजना सुरु करून राबविल्या.

 त्यांच्या निधनामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष तसेच नाशिक जिल्ह्यातील जनता एका ज्येष्ट लोकनेत्याला कायमची मुकली आहे. मी पवार कुटुंबियांच्या दु:खात सहभागी असून ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो अशी मी प्रार्थना करतो असे भुजबळ यांनी शेवटी म्हटले आहे.

—————————————————————————————————–

राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते ए.टी.पवार (दादा) यांचे निधन प्रत्येक कार्यकर्त्याला हळहळ लावून जाणारे ठरले.प्रत्येक कार्यकर्त्याला ते हात जोडून विनम्रपणे सामोरे जात असत. त्यांच्यासमोर लहान-मोठा हा भेदभाव नव्हता. सर्वांची गाऱ्हाणी व समस्या ऐकून त्यावर तातडीने संबंधीत अधिकारी व पदाधिकाऱ्यांकडून ते उपाययोजना करत असत.            ए.टी.पवार दादांनी कळवण-सुरगाणा सारख्या त्या काळात अतिशय दुर्गम असलेल्या आदिवासी भागात बंधारे, पाझर तलाव, तलाव, कालवे यासारख्या माध्यमातून मोठया प्रमाणावर सिंचनाच्या योजना राबवून आपल्या विधानसभा मतदार संघाला सुजलाम-सुफलाम केले. त्यामुळे तेथील जनतेने त्यांना आदराने ‘पाणदेव’ अशी पदवी दिली आणि ते सर्वसामान्यांचे पाणदेव झाले.   ७९ वर्षीय दादांनी एम.ए. पदवी घेतलेली असतांनाही स्वत:ला समाजासाठी वाहून घेतले होते. उच्चशिक्षित, विनम्रता, सामाजिक बांधिलकीची जाण असलेले अभ्यासू नेतृत्व आज जिल्ह्याला पोरके करून गेले आहे.

सामाजिक व राजकीय कारकिर्दीमध्ये राज्याच्या मंत्रीपदापर्यंत केलेल्या राजकीय प्रवासात अनेक समाजोपयोगी व जलसिंचनाचे विविध निर्णय घेऊन त्यांनी आपले वेगळेपण जपले होते. सर्वसामान्यांमधुन आलेला सर्वसामान्यांचा नेता आज आपल्यातून निघून गेलेला आहे. त्यांचे कार्य प्रत्येकाला प्रेरणादायी ठरेल. जिल्ह्यातील सामाजिक व ग्रामिण भागातील प्रश्नांची जाण असलेला नेता गेल्याने जिल्ह्यात कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे.  दादांना भावपूर्ण श्रद्धांजली !

–         अॅड. रविंद्र पगार

जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी

————————————————————————————————–

 जिल्ह्य़ाचे पाणीदार नेते माजी मंत्री ए.टी. पवार साहेब यांचे आज दुखःद निधन झाले… कळवण सारख्या आदिवासी तालुक्याला समृध्द करून वैभव प्राप्त करून देणारे पवार साहेब यांच्या जाण्याने जेष्ठ मार्गदर्शक हरपला आहे. ..

भावपूर्ण श्रध्दांजली….

–         सचिन पंडितराव पिंगळे

जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस, नाशिक

————————————————————————————–

माजी राज्यमंत्री ए.टी.पवार यांचा अंत्यविधी शासकीय इतमामात करण्याची

आमदार जयवंतराव जाधव यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी

 नाशिक,दि.१० मे:- राज्याचे माजी राज्यमंत्री व तापी महामंडळाचे माजी अध्यक्ष ए.टी.पवार यांनी केलेली लोकोपयोगी कामे, आदिवासी बांधवांची केलेली सेवा आणि आजवरच्या त्यांच्या कार्याचा विचार करता त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यविधी करण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार जयवंतराव जाधव यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नाशिकचे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्याकडे केली आहे.

आमदार जयवंतराव जाधव यांनी मुख्यमंत्र्यांना फॅक्स केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, श्री. ए.टी.पवार यांचे आज रोजी वयाच्या ७९ व्या वर्षी दु:खद निधन झाले आहे. त्यांनी सतत आठ वेळा विधानसभेवर प्रतिनिधित्व केले आहे. आदिवासींच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी स्वतंत्र आदिवासी विकास मंत्रालयाची स्थापना करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. आदिवासी बांधावासाठी जलसिंचनाच्या माध्यमातून विकासाची गंगा त्यांनी मतदार संघात आणली.

आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी सतत पाठपुरावा केला. त्यांनी केलेली लोकोपयोगी कामे, आदिवासी बांधवांची केलेली सेवा आणि त्यांच्या आजवरच्या कार्याचा विचार करून त्यांचा अंत्यसंस्कार शासकीय इतमामात करण्यात यावा असे त्यांनी पत्रात शेवटी म्हटले आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.