महावितरणच्या मेळाव्यांना ग्राहकांचा मोठा प्रतिसाद
नाशिकः महावितरणच्या वतीने नाशिक शहर विभाग दोन तसेच नाशिक ग्रामीण विभागात आयोजित ग्राहक तक्रार निवारण व संवाद मेळाव्यांना वीज ग्राहकांनी मोठा प्रतिसाद दिला. गेल्या तीन दिवसात झालेल्या या मेळाव्याचा जवळपास १८०० वीज ग्राहकांना लाभ पोहचला. तर १५०० नवीन ग्राहकांना वीज जोडणी देण्यात आली असून आणखी दोन हजार ग्राहकांना वीज जोडणी देण्याची प्रक्रिया सुरु आहे.

मुख्य अभियंता श्री. दीपक कुमठेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक परिमंडलात वीज ग्राहकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी ग्राहक तक्रार निवारण व संवाद दिनाचे आयोजन होत आहे. नाशिक ग्रामीण विभागातील ननाशी, उमराळे, पेठ आणि गोंदे येथे स्वतंत्रपणे आयोजित ग्राहक मेळाव्यात नवीन वीज जोडणीसाठी साडेतीन हजारपेक्षा अधिक अर्ज आले होते. अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील नवीन ग्राहकांना दोनशे रुपयांमध्ये वीज जोडणी देण्यात येत असल्याने नवीन जोडणीसाठी अर्जाची संख्या अधिक आहे. यातील १४५० जणांना तात्काळ जागेवर मीटर देऊन वीज जोडणी देण्यात आली. उर्वरित अर्जांन्वर वीज जोडणी देण्याची कार्यवाही सुरु आहे. बिलासंदर्भातील ३५ व इतर २३ तक्रारीचेही या मेळाव्यातून निवारण करण्यात आले.

नाशिक शहर विभाग दोनमधील शिखरेवाडी उपविभाग, नाशिक रोड उपविभागातील लहवीत नायगाव आणि नानेगाव येथे स्वतंत्रपणे आयोजित ग्राहक मेळाव्यात १८६ वीज ग्राहक सहभागी झाले. बिलांबाबतच्या ४५, तांत्रिक ७८ तर इतर १४ तक्रारींचे निवारण या मेळाव्यातून करण्यात आले. नाशिक शहर विभाग एक पंचवटी, सातपूर, भद्रकाली आणि सिडको उपविभागातील ग्राहकांसाठी २८ ऑगस्ट रोजी ग्राहक तक्रार निवारण व संवाद दिन आयोजित करण्यात आला आहे. मालेगाव विभागातील ग्राहकांसाठीही सोमवारी (२८ ऑगस्ट) ग्राहक मेळावा होणार आहे. इगतपुरी उपविभागातील टाकेद येथेही याच दिवशी मेळावा घेण्यात येईल. या मेळाव्यात सहभागी होऊन तक्रारींचे निराकरण करून घ्यावे, असे आवाहन मुख्य अभियंता श्री. कुमठेकर यांनी वीज ग्राहकांना केले आहे.