नाशिक : गेल्या ९ एप्रिल रोजी घोटी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सिन्नर पहाता येथे ड्रायव्हरला पिस्तुलाचा धाक दाखवून त्याचा मोबाईल व रोख २८०० रुपये असा ऐवज काढून घेऊन त्याची टाटा झेस्ट कार जबरीने पळवून घेऊन जाणार्या टोळीला अटका करण्यात नाशिक ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर नवले यांनी गुन्ह्याची कार्यप्रणाली अभ्यासून मिळविलेल्या गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने वेहेळगाव ता. राहुरी, जि. अहमदनगर येथून आरोपी राकेश राजेंद्र संसारे (वय २१, रा. देवळाली प्रवारा, ता. राहुरी, जि.नगर), रजनीकांत संजय गरुड (वय २१, रा. नागपूर एम.आय डी सी अहमदनगर) यांना शिताफीने ताब्यात घेतले. सदर आरोपींनी त्यांचे साथीदार ३) रामा वस्ताद, ४) राहुल जायभावे यांचेसह वरील गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.
सदर गुन्ह्याचे तपासात आरोपींनी फिर्यादीला आमचेकडे पिस्तूल आहे असे घाबरवून त्यास मारहाण करून त्याचे ताब्यातील टाटा झेस्ट कार, एक मोबाईल फोन व रोख रक्कम जबरीने चोरून नेल्याची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यातील जबरीने चोरून नेलेली सिल्व्हर रंगाची टाटा झेस्ट कार क्र. एम एच ४१ व्ही ७५१६ व एक सॅमसंग कंपाईचा मोबाईल फोन असा एकूण ५,०१,०००/- रु. किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
आरोपी राकेश संसारे हा मालेगाव तालुका पो. स्टे. । गु र न १८५/२०१६ भादंवि कलम ३९५,३९७ या गुन्ह्यात फरार होता. सदर आरोपीने मालेगाव मनमाड रोडवर चोंढी घाटात सुमारे १६ टन लसूण भरलेली मालट्रक किंमत रुपये 20 लाखाचा मुद्देमाल दरोडा टाकून नेल्याची कबुली दिली असून त्यांचेकडून अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.