नवी दिल्ली : भविष्यात केवळ ‘आधार’ हेच एकमेव ओळखपत्र अस्तित्वात असेल. व्होटर आयडी, पॅनकार्ड हे सर्व ओळख पत्र बाद होऊन सर्व कारणांसाठी आधार कार्ड सक्तीचे असणार आहे. कोणत्याही भारतीय व्यक्तीची संपूर्ण ओळख या एकाच कार्डाच्या माध्यमातून केली जाईल, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बुधवारी लोकसभेत दिली. प्राप्तीकर भरताना आधार कार्ड नंबर देणे अनिवार्य केले असून जीएटी लागू होण्याबरोबरच १ जुलै पासून हा नियम लागू होण्याची शक्यता आहे.
लोकसभेत खासदारांनी विचारलेल्या प्रश्नांना जेटली उत्तर देत होते. वित्तीय विधेयकावरील चर्चेदरम्यान सरकारने वित्तीय विधेयकात तब्बल ४0 सुधारणा सुचवल्या आहे. प्राप्तीकर परतावा अर्ज भरण्यासाठी आधार क्रमांक अनिवार्य करण्याच्या सुधारणेचाही समावेश आहे. सरकार येत्या जुलैपासूनच हा नियम लागू करण्याच्या विचारात आहे.
असे आहेत महत्वाचे मुद्दे :
अमेरिकन सामाजिक सुरक्षा नंबरच्या धर्तीवर आधार क्रमांक वापरला जाणार
प्राप्तीकर परतावा अर्ज भरण्यासाठी आधार क्रमांक अनिवार्य
देशातील १0८ कोटी म्हणजेच ९८% प्रौढ नागरिकांकडे आधार कार्ड त्यामुळे अंमलबजावणी सोपी
प्राप्तीकर परतावा अर्जाशी आधार क्रमांक जोडल्याने करचोरीला आळा घालण्यास मदत होईल.
देशातील अधिकाधिक जनता कराच्या जाळ्यात आणण्यासाठी प्रयत्न
यतीन देशाचे उत्पन्न वाढणार त्यासाठी करांचे दर कमी करण्यात आल्याचा जेटलींचा दावा.